मूल कृषी उत्पन्न बाजार समितीवर काँग्रेसच्या वडेट्टीवार रावत गटाचा तिरंगा, खासदार समर्थक तिकडीला चारली पराभवाची धुळ

92

मूल : ग्रामीण राजकारणाचे केंद्र स्थान म्हणून ओडखल्या जाणा-या कृषी उत्पन्न बाजार समिती मूलच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत काॅंग्रेसच्या शेतकरी विकास आघाडीने खासदार समर्थक गटाच्या शेतकरी महाविकास आघाडीला धुळ चारत गुलाल उधळला असून पुन्हा एकदा समितीवर संतोष रावत यांनी शेतकरी विकास आघाडीच्या रूपाने वर्चस्व प्रस्थापीत केले आहे. खासदार समर्थकांना साधा भोपळाही फोडता आला नाही. हे विशेष.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अठरा संचालका पैकी हमाल तोलारी मतदार संघात रमेश बरडे अविरोध निर्वाचित झाल्याने काल सतरा संचालक पदांसाठी गुप्त मतदान पार पडले. अकरा संचालक निवडुन दयावयाच्या सेवा सहकारी संस्था मतदार संघात सतरा उमेदवारांनी नशीब अजमावले. या मतदार संघाच्या सर्वसाधारण गटात काॅंग्रेसच्या रावत गटाचे बाजार समितीचे माजी सभापती घनश्याम येनुरकर, राकेश रत्नावार यांचेसह माजी संचालक राजेंद्र कन्नमवार, अखील गांगरेड्डीवार आणि किशोर घडसे यांनी पुन्हा संचालक पदाची खुर्ची बळकावली आहे. या गटात रावत गटाचे सुनिल गुज्जनवार आणि हसन वाढई असे एकुण सातही संचालक निर्वाचित झाले आहे. या गटात खासदार समर्थक गटाचे किरण पोरेड्डीवार, सुधाकर बांबोळे आणि पराग वाढई यांना पराभव स्विकारावा लागला. सेवा सहकारी संस्थेच्या महिला राखीव गटात काॅंग्रेसच्या रावत गटाच्या चंदा कामडी आणि उषा शेरकी विजयी झाल्या, खासदार समर्थक गटाच्या वनिता हरडे पराभुत झाल्या, इमाव गटातून काॅंग्रेसच्या रावत गटाचे सुमीत आरेकर यांनी खासदार समर्थक गटाचे नरेंद्र चैधरी यांचा पराभव केला तर विजाभज राखीव गटात बाजार समितीचे माजी उपसभापती रावत गटाचे संदीप कारमवार यांनी खासदार समर्थक गटाचे पंकज पुल्लावार यांना पराभवाची धुळ चारली. चार संचालक निवडून दयावयाच्या ग्राम पंचायत मतदार संघात दोन संचालक निवडून दयावयाच्या सर्वसाधारण गटात काॅंग्रेसच्या रावत गटाचे राहुल मुरकुटे आणि लहुजी कडस्कर यांनी बाजी मारली असून त्यांनी खासदार समर्थक गटाचे राकेश दहीकर आणि भाजप विचाराचे स्वतंत्र उमेदवार रंजीत समर्थ यांचा पराभव केला. अनुसूचित जाती जमाती गटातून रावत गटाच्या शेतकरी विकास आघाडीचे शालीक दहीवले यांनी खासदार समर्थक गटाचे अरविंद वनकर आणि भाजप विचाराचे स्वतंत्र उमेदवार प्रशांत बांबोळे यांचा पराभव केला. आर्थिक दृष्टया दुर्बल गटातून काॅंग्रेसच्या रावत गटाचे जालींदर बांगरे यांनी खासदार समर्थक गटाचे भुपेश दुर्गे यांना पराभवाची धुळ चारली. दोन संचालक निवडून दयावयाच्या व्यापारी अडते मतदार संघात तुलाराम घोगरे या अडत्याने तर अमोल बच्चुवार हे व्यापारी सिंकदर ठरले आहे. या गटात कासु वेंकन्ना साईलु आणि सुधाकर मोहुर्ले पराभूत झाले. या गटात काॅंग्रेसच्या रावत गटाच्या शेतकरी विकास आघाडीने अडते तुलाराम घोगरे आणि सुधाकर मोहुर्ले यांना पाठींबा दिला होता. अठरा संचालकीय मूल कृषी उत्पन्न बाजार समिती मध्यें काॅंग्रेसच्या विजय वडेट्टीवार व संतोष रावत गटाने सोळा जागेवर विजय मिळवत समितीवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापीत केले आहे. परंतु विजयोत्सव साजरा करतांना व्यापारी मतदार संघातुन विजयी झालेले अमोल बच्चुवार आणि हमाल तोलारी संघातुन अविरोध निर्वाचित झालेले रमेश बरडे हे दोन्ही संचालक काँग्रेसच्या रावत गटात सहभागी झाले होते. पार पडलेली बाजार समितीची निवडणुक भाजप विरूध्द काॅंग्रेस अशी रंगेल अशी चर्चा होती. परंतू ऐनवेळेवर भाजपा समर्थक उमेदवारांनी निवडणुक रिंगणातून माघार घेतल्याने पार पडलेली निवडणुक काॅंग्रेस विरूध्द काँग्रेस अशी झाली. समितीवर वर्चस्व प्रस्थापीत केलेल्या काॅंग्रेसच्या शेतकरी विकास आघाडीने यावर्षी माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांचे मार्गदर्शनात आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत आणि काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांचे नेतृत्वात गड लढविला तर काॅंग्रेसच्या शेतकरी महाविकास आघाडीचे नेतृत्व करणारे माजी आमदार देवराव भांडेकर, जि.प.चे माजी अध्यक्ष प्रकाश पाटील मारकवार आणि जि.प.चे माजी उपाध्यक्ष विनोद अहीरकर यांना खासदार बाळुभाऊ धानोरकर यांनी छुपा पाठींबा दिला होता. त्यामूळे झालेल्या बाजार समिती निवडणुकीत काॅंग्रेस विरूध्द काॅंग्रेस असा सामना रंगवतांना विरोधकांनी मात्र दुफळी निर्माण करण्यात मनसोक्त आनंद घेतला. हे तेवढच खरं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here