दबावाला बळी पडत नसल्याने आपल्याविरूध्द मनमानीचा आरोप, चोरांच्या उलट्या बोंबा असल्याचे सरपंच शिल्पा भोयर यांचे मत

39

मूल : उपसरपंच पद हुकल्याने काही मंडळी आपल्यावर दबावतंत्राचा वापर करीत आहेत. परंतू त्यांच्या दबावाला बळी न पडता सर्वांना विश्वासात घेवून सरपंच म्हणून मागील अडीच वर्षापासून गावांच्या विकासासाठी काम करीत आहे. असे असतांना विश्वासात न घेता मनमानी करीत असल्याचा आरोप म्हणजे चोराच्या उलटया बोंबा असल्याचे मत डोंगरगांव येथील सरपंच शिल्पा भोयर यांनी व्यक्त केले.

आयोजीत पत्रकार परिषदेत बोलतांना सरपंच शिल्पा भोयर यांनी माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य नामदेव खोब्रागडे आणि किरण पोरेड्डीवार यांनी आपल्या विरूध्द संबंधीत विभागाकडे तक्रार केली असून पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मनमानी कारभार करण्याचा आरोप केला आहे. करण्यांत आलेला आरोप निराधार असून ग्राम पंचायतीचे सर्व सदस्य, गावांतील ज्येष्ठ व अनुभवी मंडळी आणि पक्षाच्या नेत्यांना विश्वासात घेवून मागील अडीच वर्षापासून गावात विकासाच्या योजना राबवित आहे. अडीच वर्षापासून सरपंच पदावर काम करतांना सदस्य नामदेव खोब्रागडे आणि किरण पोरेड्डीवार आदिंना आजपर्यंत आपला मनमानी कारभार दिसला नाही, अलीकडेच मात्र त्यांना आपला मनमानी कारभार दिसावा. याविषयी सरपंच शिल्पा भोयर यांनी आश्चर्य व्यक्त केले. स्मशानभूमी मध्यें खोदण्यात आलेली बोअरवेल भुजल सर्वेक्षण विभागाने दिलेल्या पाण्याचा स्त्रोतच्या प्रमाणपत्रानुसार खोदण्यात आली असून 200 फुट खोदण्यात आली आहे. यावेळी नामदेव खोब्रागडे प्रत्यक्ष उपस्थित होते. असे असतांना तब्बल पंधरा महिण्यानंतर बोअरवेल खोदण्याची तक्रार करावी. हे न उलगडणारे कोडे असल्याचे मतही शिल्पा भोयर यांनी व्यक्त केले. प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची दुरूस्ती, देखभाल व विस्तारीकरणाचे काम जनतेची गरज आणि मागणी लक्षात घेवून ग्राम पंचायतीच्या सभेत ठराव पारीत करून हाती घेण्यात आले आहे, असे सांगतांना सरपंच शिल्पा भोयर यांनी सदर कामाची जाहीरात प्रकाशित केल्यानंतर प्राप्त झालेल्या निवीदेनुसार संबंधीत विभागाकडून मंजुर करण्यात आलेले अंदाजपत्रक आणि बांधकामाच्या आराखडयानुसारचं करण्यात येत आहे. गावांच्या विकासात सरपंच जेवढा जबाबदार आहे तेवढाच ग्राम विकास अधिकारीही जबाबदार असून ते ग्रामविकासाच्या रथाचे दोन चाके आहेत. प्रशासकिय दृष्टया त्यांचेकडून मार्गदर्शन घेतल्याशिवाय काम करणे अशक्य असल्याने त्यांचे मार्गदर्शन आम्ही सदैव घेत असतो. त्यांचे काम उत्तम असून गावांच्या विकासात त्यांचेही मोलाचे योगदान आहे. असे असतांना त्यांचेविरूध्द करण्यात येत असलेले आरोप त्यांना बदनाम करण्याचे कारस्थान असल्याचे मत सरपंच भोयर यांनी व्यक्त केले. ग्राम पंचायतीच्या कोणत्याही सभेत आपण कोणालाही जातीवाचक अथवा अर्वाच्च शब्दात बोललो नसून महिला सरपंच म्हणून आपल्या बदनामी करीता सदस्य नामदेव खोब्रागडे आणि किरण पोरेड्डीवार बिनबुडाचे आरोप करीत असल्याचे मतही सरपंच शिल्पा भोयर यांनी व्यक्त केले. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती तुळशीराम मडावी, ज्येष्ठ भाजपा कार्यकर्ते तथा माजी सरपंच लहुजी थेरकर, मुकेश गेडाम, ग्राम पंचायत सदस्य सुभाष वाढई, देवराव हनवते, मंजुळा लेनगुरे, शालीनी धुर्वे यांचेसह स्थानिक कार्यकर्ते मोठया संख्येेनी उपस्थित होते.

सदस्य नामदेव खोब्रागडे हे भाजपा आघाडी कडून निर्वाचित झाले असून सध्यास्थितीत त्यांचे सोबत भाजपाचे एकही सदस्य नाही, ते विरोधी सदस्यांच्या पंगतीमध्यें बसून स्वपक्षाच्या सरपंचा विरूध्द निराधार आरोप करून पक्षाला बदनाम करू पाहत आहे. त्यामुळे याविरूध्द पक्षाच्या वरीष्ठ नेत्यांकडे तक्रार करणार आहे  – सरपंच शिल्पा भोयर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here