मूल : राजोली आणि मूल येथील एल्गार महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पत संस्थेमध्यें आर्थिक गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी करूनही संबंधीत विभाग दुर्लक्ष करीत असल्याने न्याय मागायचे कोणाला ? असा प्रश्न ग्राहकांना पडला आहे.
अडीअडचणीच्या काळात आर्थिक सहकार्य करण्याच्या उदात्त हेतूने वीस वर्षापूर्वी राजोली आणि मूल येथे एल्गार महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पत संस्थेची निर्मिती करण्यात आली. वीस वर्षापासून तालुक्यातील मूल आणि राजोली येथे सदर पत संस्था नियमित आणि सुरळीत सुरू असताना एका वर्षापासून संस्थेच्या आर्थिक व्यवहारात अनियमितता होवू लागली. एकमुस्त रक्कम मिळेल या उद्देशाने शेकडो ग्राहकांनी पत संस्थेच्या राजोली आणि मूल शाखेत मुदती ठेव, आवर्ती ठेव आणि दैनिक बचत खाते उघडून यथाशक्ती रक्कम गोळा केली. गोळा केलेली रक्कम परत घेण्याची मुदत झाल्यानंतर अनेक ग्राहक संस्थेच्या कार्यालयात गेले तेव्हा शाखा व्यवस्थापक त्यांना कारण सांगून रक्कम देण्यास टाळाटाळ करू लागले. आज ना उदया रक्कम मिळेल, या उद्देशाने ग्राहक सतत जावू लागले तेव्हा राजोली येथील शाखा व्यवस्थापक गणेश अगडे, मूल येथील रविंद्र कोलटवार आणि सुशिल श्रीमंतवार हे ग्राहकांना पत संस्थेत परत देण्यासाठी रक्कमचं उपलब्ध नसल्याचे सांगून हात वर करू लागले. परिश्रम करून रक्कम गोळा केल्यानंतर कामाच्या वेळेस आणि मुदत संपल्यानंतर हक्काची रक्कम परत मिळत नसेल तर काय उपयोग म्हणून ग्राहक शाखा व्यवस्थापकाकडे तगादा लावू लागल्याने तिघाही व्यवस्थापकांनी पत संस्थेला रामराम ठोकला. दरम्यान पत संस्थेत शाखा व्यवस्थापक गैरहजर दिसू लागल्याने ग्राहकांनी आपला मोर्चा पत संस्थेच्या अध्यक्षा आणि संचालकवृंदाकडे वळविला. रक्कम मागण्यासाठी ग्राहक सातत्याने घरी येवू लागल्याने संचालक मंडळाने तिघाही शाखा व्यवस्थापकांना धारेवर धरून विचारणा केली तेव्हा तिघांनीही तो मी नव्हेच असा पावित्रा घेतला. त्यामूळे शेवटी पत संस्थेच्या अध्यक्ष यांनी जिल्हा निबंधक, दुयम निबंधक आणि पोलीस स्टेशन मूल येथे शाखा व्यवस्थापक गणेश अगडे, रविंद्र कोलटवार आणि सुशिल श्रीमंतवार यांचे विरूध्द तक्रार नोंदवली. पत संस्थेच्या अध्यक्षा आणि कार्यकारी मंडळाने तिघाही व्यवस्थापकांविरूध्द तक्रार नोंदवून आज सात ते आठ महिण्यांचा काळ लोटला. परंतू आजपर्यंत निबंधक कार्यालयाने पत संस्थेत झालेल्या आर्थिक व्यवहाराची शासकिय स्तरावरून पाहिजे त्या प्रमाणांत चौकशी केलेली नाही. यामूळे सदर पत संस्थेत कोणी आणि किती रक्कमेचा गैरव्यवहार केला हे अद्याप सिध्द झालेले नाही. परिश्रमाने जमा केलेली रक्कम परत मिळत नसल्याने दररोज शेकडो ग्राहक पत संस्था आणि पदाधिका-याच्या घरी फे-या मारत आहेत. परंतू अद्याप त्यांना रक्कम परत मिळत नसल्याने ग्राहकांमध्यें प्रचंड संताप पसरल्याचे दिसून येत असून पत संस्थेच्या दोन्ही कार्यालयात घडलेल्या आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी करून ग्राहकांना न्याय मिळावा. अशी पत संस्थेच्या ग्राहकांसोबतचं संचालक मंडळाचीही मागणी आहे.
नियम आणि कायदयान्वये पत संस्थेची निर्मिती केल्यानंतर संस्थेमधील कर्मचा-यांवर नियंत्रण ठेवणे ही संस्थेच्या पदाधिका-यांची जबाबदारी आहे. पदाधिका-यांनी या जबाबदारीकडे दुर्लक्ष केल्याने संस्थेमध्यें आर्थिक गैरव्यवहार घडल्याचे सकृतदर्शनी दिसून येते. घडलेल्या प्रकाराची तक्रार प्राप्त झाल्यानंतर दुयम निबंधक कार्यालयाने संस्थेचे पदाधिकारी आणि व्यवस्थापक यांची सुनावणी घेतली. संस्थेने केलेल्या खाजगी लेखा परिक्षणात अनेक बाबी लपवण्यात आल्याचे दिसून येते त्यामूळे जिल्हा विशेष लेखा परिक्षण विभागाकडून फेर लेखा परिक्षण करण्यासाठी प्रस्ताव सादर केला असून फेर लेखा परिक्षणामधून आर्थिक गैरव्यवहाराचे चित्र स्पष्ट होईल.ल
लक्ष्मीकांत वानखेडे, सहायक निबंधक कार्यालय मूल