मूल : तालुक्यातील चांदापूर येथील एका शेतात कापसाचे अनधिकृत बियाणे असल्याच्या माहीती वरून कृषी विभागाच्या गुण नियंत्रण पथकाने भेट देवुन तपासणी केली असता ८ लाख ४८ हजार रूपये किंमतीचे बोगस बियाणे आढळुन आले.
चांदापूर येथील सुरेश संगोजवार हे त्यांच्या मालकीची शेती मागील तीन वर्षापासुन अन्य शेतकऱ्यांना ठेक्याने देतात. यावर्षी संगोजवार यांनी आपली शेती गडीसुर्ला येथील रविकुमार गोटेपट्टी यांना ठेक्याने दिली. ठेक्याने घेतलेल्या शेतात रविकुमार गोटेपट्टी मिरची आणि कापसाचे उत्पन्न घेत आहेत. कापसाचे उत्पन्न घेण्यासाठी रविकुमार गोटेपट्टी यांनी राज्यात परवाना प्राप्त नसलेले कापसाचे नकली बियाणे आणल्याची माहीती गुणनियंत्रण पथकाला मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे श्री रविकुमार गोटेपट्टी यांचे शेतात तपासणी केली असता शेतातील एका घराच्या बाजूला उभ्या केलेल्या महिंद्रा ट्रॅक्टर मध्ये दहा पोते खुले अनधिकृत एचटीबिटी कापूस बियाणे आढळून आले. आढळुन आलेल्या बियाण्याचे वजन केले असता बियाण्यांचे एकूण वजन पाच क्विंटल असल्याचे निदर्शनास आले. सदर बियाण्याची किंमत ८ लाख ४८ हजार इतकी, ट्रॅक्टर व ट्रॉलीसह १३ लाख ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर मुद्देमाल पोलीस स्टेशन मुल येथे जमा करून गुन्हा दाखल करण्यात आला. सदर कार्यवाही चंद्रपूर जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकरराव तोटावार यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कार्यवाहीच्या वेळी कृषी विकास अधिकारी विरेंद्र राजपूत, तालुका कृषी अधिकारी प्रशांत कासराळे, मोहीम अधिकारी लंकेश कटरे, जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक श्रावण बोडे, पंचायत समितीचे कृषी अधिकारी किशोर चौधरी, सुनील कारडवार, कृषी पर्यवेक्षक प्रकाश पराते, कृषी सहाय्यक विनोद निमगडे, कु. कविता सातपुतेआदी उपस्थित होते.
कापसाचे नकली बियाणे वापरत असल्याचे कारणावरून कृषी विभागाने रविकुमार गोटेपट्टी यांचे विरूध्द कारवाई करताच भाजपाचे दोन पदाधिकारी गोटेपट्टी यांच्या मदतीला धावले. पोलीस कारवाई होऊ नये म्हणुन बरेच प्रयत्न केले. श्रीरामलल्लाच्या दर्शानाल गेलेल्या भाजपाच्या एका पदाधिका-याने प्रकरण दडपण्यासाठी थेट अयोध्येवरून आदळआपट केली. परंतु मार्ग न निघाल्याने गुण नियंत्रण अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून पोलीस विभागाने रविकुमार गोटेपट्टी यांचे विरूध्द कारवाई केल्याने नकली बियाणे वापरणारे शेतकरी चांगलेच धस्तावले आहेत.