स्वपक्षीय सरपंचाच्या मनमानी कारभाराविरूध्द सदस्यांची तक्रार, सरपंचाला प्रौत्साहन देत असल्याचा ग्राम विकास अधिकाऱ्यावर आरोप

91

मूल : सदस्यांना विश्वासात न घेता सरपंच मनमानी कारभार करत असुन त्यांना ग्राम विकास अधिकारी सहकार्य करीत असल्याने गावांचा विकास खोळंबला आहे. असा आरोप डोंगरगांव ग्राम पंचायतीच्या पाच सदस्यांनी केला असुन मनमानी करणाऱ्या सरपंच आणि ग्राम विकास अधिकारी यांचे विरूध्द कार्यवाही न केल्यास आंदोलन करू. असा इशारा पञकार परीषदेतुन दिला आहे.

तालुक्यातील अकरा सदस्यीय ग्राम पंचायत डोंगरगांव येथे भाजपा-काँग्रेसचे प्रत्येकी पाच सदस्य असुन एक तळ्यात मळ्यात आहे. येथील सरपंच पद सर्वसाधारण प्रवर्गातील महीलेकरीता आरक्षित असल्याने भाजपाच्या शिल्पा भोयर यांची सर्वानुमते सरपंच पदी निवड झाली. तेव्हापासुन आजपर्यंत सरपंच शिल्पा भोयर ग्राम पंचायतीचा कारभार चालवतांना मनमानी कारभार असुन काँग्रेस सोबतच भाजपा कडून निर्वाचित झालेल्या ग्राम पंचायत सदस्यांना विश्वासात न घेता शासनाचे कायदे आणि नियमांचे पालन न करता स्वमर्जीने कारभार करीत आहेत. कामानिमित्य बोलण्यास गेले असता त्यांचे कडुन ग्राम पंचायत सदस्यांना तुच्छतेची व अपमानास्पद वागणुक मिळत आहे. २८ आँगस्ट रोजी झालेल्या ग्राम पंचायत सभेत सरपंच भोयर यांनी माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य नामदेव खोब्रागडे यांना जातीचा उल्लेख करून सभेमधुन बाहेर जाण्याचे सांगत अपमानीत केले. सरपंच यांची ही कृती निंदनिय असुन बेबंदशाहीचे द्योतक असल्याचा आरोप सदस्य किरण पोरेड्डीवार यांनी केला. सरपंच पदाच्या दोन वर्षाच्या काळात सरपंच शिल्पा भोयर यांनी अनेक गैरव्यवहार केले असुन मिळालेल्या शासकीय निधीचाही मोठ्या प्रमाणात गैरवापर केला आहे. गावांच्या विकासासाठी लोककल्याणकारी योजनांची अंमलबजावणी न करता स्वमर्जीने कारभार केल्या जात आहे. सरपंच भोयर यांच्या मनमानी कारभारामूळे एकेकाळी आदर्श गांव ठरलेले डोंगरगांव विविध समस्यांनी ग्रासले आहे. सरपंच यांचा मनमानी कारभारा विषयी ग्रा. पं. सदस्य आणि जनतेच्या तक्रारी असतांना ग्राम विकास अधिकारी राजेंद्र येरमे याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करून सरपंच भोयर यांना मनमानी कारभार करण्यास प्रौत्साहन देत असल्याचा आरोप करताना सदस्य नामदेव खोब्रागडे यांनी होत असलेल्या आर्थिक गैरव्यवहारात ग्राम विकास अधिकारी राजेंद्र येरमे यांचाही सहभाग असावा. अशी शंका व्यक्त केली. ग्राम पंचायतीच्या सभेचे आयोजन करतांना विषय सुची नुसार चर्चा घडवुन निर्णय न घेता स्वमर्जीच्या विषयावार चर्चा केल्या जात असल्याने गांव विकासाच्या अनेक योजनांची वाट लागली आहे. असा आरोप करतांना उपस्थित सदस्यांनी सरपंच आणि ग्राम विकास अधिकाऱ्याचा संगनमताने १४ व्या वित्त आयोगाच्या निधीमधुन करण्यात आलेल्या बांधकामा सोबतच होत असलेल्या कारभाराची चौकशी करण्यात यावी. अशी मागणी केली आहे. पक्षाचे ग्रा.पं. सदस्य असताना सरपंच भोयर स्वपक्षीय सदस्यांना विश्वासात न घेता कारभार करत असल्या बाबत पक्षाच्या तालुकाध्यक्षा तथा जि.प.च्या माजी अध्यक्ष संध्याताई गुरनुले, पंचायत समितीचे माजी सभापती चंदु मारगोनवार यांचे कडे अनेक तक्रारी केल्या, परंतु त्यांचे कडुन सरपंच भोयर यांना समजावुन सांगण्याचे काहीही प्रयत्न न झाल्याने सरपंच भोयर यांचा मनमानी कारभार आजही सुरूच आहे. त्यामुळे सरपंच आणि ग्राम विकास अधिका-याच्या मनमानी कारभाराला पक्षनेतृत्वाचेही समर्थन असावे. अशी शंका व्यक्त केली. त्यामूळे येत्या काही दिवसात सरपंच भोयर यांचे विरूध्द पालकमंञी सुधीर मुनगंटीवार आणि भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा यांचे कडे तक्रार करणार असल्याचे सदस्यांनी सांगितले. सरपंच शिल्पा भोयर आणि ग्राम विकास अधिकारी राजेंद्र येरमे यांच्या संगनमताने होत असलेल्या गैरकारभाराची चौकशी करून कार्यवाही करावी. या मागणीचे निवेदन संवर्ग विकास अधिकाऱ्यासह वरीष्ठ अधिकारी, पालकमंञी आणि विरोधी पक्षनेते यांना दिले आहे. त्यामुळे पंधरा दिवसात चौकशी होईल असा आशावाद व्यक्त करताना न झाल्यास जन आंदोलन करण्याचा इशारा दिला. पञकार परीषदेला ग्रा.पं. सदस्य नामदेव खोब्रागडे, किरण पोरेड्डीवार, हिराबाई शेंडे, दिपीका चिरके, नलीनी सोनुले यांचेसह भाजपा कार्यकर्ते रमेश टिकले, रविंद्र मेश्राम, दिलीप मसराम, जानकीराम गेडाम आणि विठ्ठल बोपेवार उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here