मूल : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित सभापती राकेश रत्नावार आणि उपसभापती राजेंद्र कन्नमवार यांनी आज पदभार सांभाळला. समितीच्या सभागृहात पदग्रहणाचा छोटेखानी कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. यावेळी समितीचे नवनिर्वाचित संचालक घनश्याम येनुरकर, संदीप कारमवार, अखील गांगरेड्डीवार, राहुल मुरकुटे, चंदाताई कामडी, जालींदर बांगरे, सुमीत आरेकर, अमोल बच्चुवार, किशोर घडसे आणि रमेश बरडे यांचेसह काॅंग्रेसचे तालुकाध्यक्ष गुरू गुरनूले, शहर अध्यक्ष सुनिल शेरकी, युवक काॅंग्रेसचे तालुकाध्यक्ष पवन निलमवार उपस्थित होते. अठरा सदस्यीय बाजार समितीवर काॅंग्रेसच्या वडेट्टीवार आणि रावत गटाने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापीत केले आहे. सर्वप्रथम बाजार समितीचे सचिव अजय गंटावार यांनी राकेश रत्नावार यांनी सभापती तर राजेंद्र कन्नमवार यांनी उपसभापती पदाचा पदभार सांभाळण्याची कार्यवाही पुर्ण केली. पदग्रहण कार्यक्रमानंतर नवनिर्वाचित सभपती राकेश रत्नावार आणि उपसभापती राजेंद्र कन्नमवार यांचेसह नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे स्वागत करण्यांत आले. स्वागताच्या कार्यक्रमातानंतर मनोगत व्यक्त करतांना उपसभापती राजेंद्र कन्नमवार आणि सभापती राकेश रत्नावार यांनी जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे अध्यक्ष संतोष रावत आणि संचालक मंडळाने ज्या विश्वासाने समितीचे पद बहाल केले, विश्वासाला तडा न पोहोचवता बाजार समितीवर अवलंबून असलेल्या सर्व घटकांची प्रगती आणि हितासाठी कार्य करण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे संचालन शहर अध्यक्ष सुनिल शेरकी यांनी तर आभार तालुकाध्यक्ष गुरू गुरनूले यांनी मानले. कार्यक्रमाला समितीचे माजी संचालक शांताराम कामडे, धनंजय चिंतावार, मारोतराव चिताडे, राजु मारकवार, पुरूषोत्तम भुरसे, गुरू चैधरी, गंगाधर कुनघाडकर यांचेसह काॅंग्रेस, यवक काॅंग्रेस व महिला काॅंग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.