मूल : शासनाविरूध्द लढाई करायची असेल तर संपुर्ण तयारीनिशी लढावी लागते, तशी तयारी आता केली असुन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबीत असलेल्या मागण्यांच्या पूर्ततेसंबंधीचे शासन परीपञक हातात घेतल्याशिवाय आता संप मागे घेणार नाही. असा निर्धार केला असुन याकरीता महाविद्यालयीन व विद्यापीठीय कर्मचाऱ्यांनी सहकार्य करावे. असे आवाहन म. रा. महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचारी महासंघाचे सरचिटणीस तथा सेवक संयुक्त कृती समितीचे प्रमुख सल्लागार डाँ. आर.बी.सिंह यांनी केले.
चंद्रपूर-गडचिरोली जिल्हा महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेच्या वतीने सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर येथे आयोजित विचार सभेत ते बोलत होते. शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत संयुक्त कृती समितीच्या राज्यव्यापी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विदर्भातील सर्व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्याकरीता महाराष्ट्र राज्य विद्यापीठीय व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीच्या वतीने येत्या २० फेब्रुवारी पासुन बेमुदत संप पुकारला आहे. त्यासंबंधी चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना आज आर.बी.सिंह यांनी मार्गदर्शन केले. यावेळी महाराष्ट्र राज्य
महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष रा.जा.बढे, उपाध्यक्ष प्रमोद बडगे, सरदार पटेला महाविद्यालयाचे उपप्राचार्य डाँ. स्वप्नील माधमशेट्टीवार, राज्य संघटनेचे पदाधिकारी चंदर पांडे, उमेश पाटील, भंडारा जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर सहारे, संजय समरीत, प्रभाकर कुथे, रामचंद्र निखाडे, कृती समितीचे माजी सदस्य गजानन काळे, पुंडलीक ठेंगरे, राममोहन ब्राडीय, विनोद चोपावार, लोमेश दरडे आदी उपस्थित होते.
यावेळी सरदार पटेल महाविद्यालयाचे उपप्राचार्य डाँ. स्वप्नील माधामशेट्टीवार यांनी शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी फुट पडु न देता माधमाश्यांच्या पोळ्याप्रमाणे एकसंघ राहण्याचे आवाहन करतांना शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या संपाला प्राचार्य फोरमने पाठींबा दिल्याचे प्राचार्य यांचे वतीने जाहीर केले. संघटनेचे राज्य उपाध्यक्ष प्रमोद बडगे यांनी तत्कालीन उच्च शिक्षण मंञी उदय सामंत यांनी दिलेला शब्द फिरविला म्हणुन पुन्हा संप करावा लागत असल्याचे सांगितले तर राज्यध्यक्ष रा.जा.बढे यांनी न्याय मागण्यासोबतच आपली संघटना शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरल्या जावी म्हणुन प्रयत्नशील असल्याची ग्वाही दिली, यावेळी चंदर पांडे, संजय समरीत आणि गजानन काळे यांनीही विचार व्यक्त केले.
दिप प्रज्वलनाने सुरू झालेल्या विचार सभेचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष प्रशांत रंदई यांनी केले. यावेळी जिल्हा संघटनेच्या वतीने डाँ, आर.बी.सिंह, रा.जा.बढे,प्रमोद बडगे यांचा सत्कार करण्यात आला, कार्यक्रमाचे संचलन जिल्हा विदर्भ प्रतिनिधी संजय रामटेके यांनी तर महासचिव अरूण जुनघरे यांनी आभार मानले. विचार सभेला विदर्भातील विविध महाविद्यालयाचे शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येनी उपस्थित होते.