कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेल्या महिला रूग्णांची हेळसांड, मूल उपजिल्हा रूग्णालयातील प्रकार : औषधी न देताच महिलांना दिला डिस्चार्ज

119

मूल : मूल येथील उपजिल्हा रूग्णालयात आठवडाभरापूर्वी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेल्या महिला रूग्णांना वेळेवर योग्य औषधोपचार न झाल्याने काही महिलांना कमालिचा त्रास सहन करावा लागल्याचा प्रकार पुढे आला आहे. विशेेष म्हणजे, या महिलांना डिस्चार्ज देताना कार्डवर दहा दिवसांच्या गोळया लिहून देण्यात आल्या आणि हातात केवळ दोन गोळया देऊन घरी पाठविण्यात आले व उर्वरित गोळया बाहेरून घेण्याचा सल्ला देण्यात आल्याने शासनाच्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेच्या मोहिमेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

शासनाने लोकसंख्या वाढीवर नियंत्रण मिळविंण्यासाठी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यासाठी गावागावात जनजागृती सुरू केली आहे. एका किंवा दोन अपत्यावर शस्त्रक्रिया करणाऱ्यांना शासनाकडून आर्थिक लाभही दिला जातो. प्रत्येक आरोग्य केंद्न, रूग्णालयांना दरवर्षी शस्त्रक्रियेचे उद्दीष्ट ठरवून दिले जाते. गावातील आशावर्कर, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका यांना कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचे उद्दीष्ट साध्य करण्याची जबाबदारी सोपविली जाते. या कर्मचारी महिला, पुरूषांना शस्त्रक्रियेसाठी रूग्णालयात आणतात. परंतु, रूग्णालयांमध्ये अशा रूग्णांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा प्रकार मूल उपजिल्हा रूग्णालयात अनुभवायला आला. या रूग्णालयात १४ नोव्हेंबर रोजी कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी १४ महिलांना भरती करण्यात आले. यातील अनेक महिला बाहेरगावच्या होत्या. त्यांच्यावर १५ नोव्हेंबरला शस्त्रक्रिया करण्यात आल्या. मात्र, त्यानंतर तब्बल दोन दिवस एकाही वैदद्यकीय अधिकाऱ्याने या महिलांकडे येवून बघितले नाही. याबाबत रूग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांना माहिती दिल्यानंतर तिसऱ्या दिवशी महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शस्त्रक्रिया केलेल्या महिलांच्या वॉर्डात येऊन पाहणी केली. रूग्णांना सलाईन लावल्यानंतर ती संपल्यावर बंद करून काढण्याची जबाबदारीही या रूग्णांच्या नातेवाइकांवरच असायची. वार्डात कर्तव्यावर असलेल्या परिचारीकांना सांगायला गेल्यास तुम्हाला बंद करता येत नाही काय, असा उलट प्रश्न त्यांच्याकडूनच विचारला जायचा. त्यामुळे खरेच सरकारी रूग्णालयांमध्ये किती प्रामाणिकपणे रूग्णांची सेवा केली जाते, याचाही प्रत्यय अनेकांना आला.
आठवडाभर या महिलांना भरती ठेवल्यानंतर २१ नोव्हेंबरला त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. डिस्चार्ज देताना दहा दिवसांच्या गोळया चिठ्ठीवर लिहून देण्यात आल्या. मात्र, प्रत्येकी केवळ दोन गोळया देऊन महिलांना घरी पाठविण्यात आले. रूग्णालयात आवश्यक गोळयाच नसल्याचे कारण सांगून बाहेरून इतर औषधी घेण्याचा सल्लाही यावेळी देण्यात आला. शस्त्रक्रियेनंतर व्यवस्थित उपचार न झाल्याने शस्त्रक्रिया केलेल्या अनेक महिलांना कमालिचा त्रास सहन करावा लागत असून, येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर असंतोष व्यक्त केला जात आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन रूग्णांची हेळसांड करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here