मूल : स्थानिक उप जिल्हा रूग्णालयात आठवडाभरापूर्वी शस्त्रक्रिया केलेल्या महिलांना अनेक कटू अनुभव आले. कुुटुंब नियोजन शस्त्रक्रिया हे राष्ट्रीय कार्य आहे. शासन यावर सर्वाधिक भर देत असून, मोठया प्रमाणात जनजागृती करून निधीही खर्च केला जातो. मात्र, शस्त्रक्रिया करण्यासाठी मूल उपजिल्हा रूग्णालयात आलेल्या महिलांना येथील अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागला. शस्त्रक्रिया होऊन सुट्टी झाल्यानंतर महिलांना त्यांच्या घरी सोडण्यासाठी रूग्णालय प्रशासनाने रूग्णवाहिकासुद्धा उपलब्ध करून दिली नाही. त्यामुळे अनेक महिलांना चक्क दुचाकीने लांब अंतरावरील आपल्या गावी परतावे लागले.
कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी येणाऱ्या महिलांना रूग्णालय ते घर ने-आण करण्यासाठी रूग्णवाहिका उपलब्ध करून देण्याचे शासनाचे निर्देश आहेत. परंतु, येथील उपजिल्हा रूग्णालयात १५ नोव्हेंबर रोजी शस्त्रक्रिया केलेल्या १४ महिलांपैकी १३ महिलांना २१ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आले. मात्र, गावाला पोहोचविण्यासाठी या महिलांना रूग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील २५ ते ३० किमी अंतरावरून शस्त्रक्रियेसाठी आलेल्या महिलांनाही आपापल्या सोयीनुसार दुचाकी, ऑटो अथवा इतर वाहनांनी घर गाठावे लागले. यातील काही महिला खूप लांब अंतरावरील गावातील होत्या. त्यांनाही सायंकाळी ५ वाजता रूग्णालयातून सुट्टी झाल्यावर आपल्या सोयीने रात्री उशिरापर्यंत घरी जावे लागल्याने महिलांनी संताप व्यक्त केला. मूल येथील उपजिल्हा रूग्णालय हे मूल तालुक्यासह परिसरातील सावली, पोंभुर्णा, सिंदेवाही आदी भागातील एकमेव मोठे रूग्णालय आहे. त्यामुळे या तालुक्यांमधून येथे उपचारासाठी येणाऱ्या रूग्णांची संख्या मोठी आहे. परंतु, येथील अव्यवस्था आणि वैद्यकीय अधिकारी -कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे सामान्य जनतेला मनस्ताप सहन करावा लागत आहे. औषधांच्या तुटवड्याची समस्याही नेहमीचीच असून, अनेकांना बाहेरून औषधी घेण्याचा सल्ला दिला जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
जिल्ह्याचे पालकमत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विधानसभा मतदार संघातील मूल हे महत्वाचे ठिकाण आहे. त्यांनी या शहराला स्मार्ट सिटी बनविण्याचा संकल्प केला असून, त्यानुसार विविध विकासकामे सुरू आहे. परंतु, जनतेच्या आरोग्यासारख्या महत्वाच्या समस्येकडे येथील रूग्णालयाकडून हेळसांड केली जात असल्याने पालकमंत्री मुनगंटीवारांच्या या संकल्पालाही हरताळ फासला जात आहे. ग्रामीण भागातील सामान्य नागरिक मोठ्या आशेने सरकारी रूग्णालयांमध्ये उपचार घ्यायला येतात. परंतु, त्यांना येथील कर्मचाऱ्यांकडून असभ्य वागणूक दिली जात असल्याने रूग्णालयात उपचारासाठी जायचे की नाही, असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडल्याशिवाय राहात नाही. या रूग्णालयातील अव्यवस्था आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणाचे अनेक उदाहरणे असतानाही स्थानिक लोकप्रतिनिधीचेही मात्र, याकडे कमालिचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.