हवश्या, गवश्या, नवश्यांना लागले आमदारकीचे डोहाळे, बल्लारपुर विधानसभा निवडणुकीत मुनगंटीवार विरूध्द कोण ? मतदारांमध्ये चर्चा

46

मूल : लोकसभा निवडणुकीची चर्चा शांत होते ना होते तोच विधानसभा निवडणुकीचे वारे वाहु लागले असुन अनेक हवश्या गवश्या नवश्यांना आमदारकीचे डोहाळे लागल्या चे दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव स्विकारत आ. सुधीर मुनगंटीवार यांनी विजयाची हॅट्रीेक साधलेल्या बल्लारपूर विधानसभा मतदार संघातून पुन्हा निवडणुक लढविण्याचे जाहीर केले असले तरी लोकसभा निवडणुकीत मिळालेले मताधिक्य गृहीत धरून महाविकास आघाडी मध्यें उमेदवारीसाठी आतापासूनच रस्सीखेच सुरू झाल्याचे दिसून येत आहे. युती धर्म पाळतांना बल्लारपूर विधानसभा मतदार संघ कोणत्या पक्षाच्या वाटयाला जाईल, हे अद्याप निश्चित नाही असे असतांना काॅंग्रेस वर्तुळात उमेदवारीसाठी चढाओढ दिसून येत आहे. क्षेत्राचे आमदार तथा राज्याचे वजनदार मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची लोकसभा निवडणुक लढविण्याची इच्छा नसतांनाही पक्षादेश पाळून त्यांनी निवडणुकीत नशिब अजमावण्याचा आटोकाट प्रयत्न केला. परंतू त्यांचे प्रयत्न कोठेतरी कमी पडल्याने त्यांचा 2 लाख 60 हजारापेक्षा जास्त मताने पराभव झाला. 2009, 2014 आणि 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीतही सुधीर मुनगंटीवार यांना मिळालेल्या मतांचा आकडा लक्षात घेतल्यास त्यांचे मताधिक्य हजारोने कमी झाले आहे. क्षेत्राच्या विकासात भरीव योगदान दिल्यानंतरही नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीतही सुधीर मुनगंटीवार यांना काॅंग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांच्या पेक्षा 48213 मत कमी पडली. एकटया बल्लारपूर विधानसभा मतदार संघात काॅंग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांना 1 लाख 21 हजार 665 तर भाजपाचे सुधीर मुनगंटीवार यांना 73452 मत मिळाली. त्यामूळे होणा-या विधानसभा निवडणुकीत काॅंग्रेस सोबतचं राकाॅंपा शरद पवार गट आणि शिवसेनेच्या उबाठा गटातील अनेकांना आमदारकीचे स्वप्न पडू लागले आहे. सध्यास्थितीत राकाॅंपा शरद पवार गट आणि शिवसेनेच्या उबाठा गटाकडून उमेदवारांचे नांव समोर येत नसले तरी उमेदवारी वाटाघाटीच्या काळात दोन्ही पक्षांकडून नांव समोर येतील. असे बोलल्या जात आहे. जिल्हयातील विधानसभा मतदार संघावर नजर फिरविल्यास राजुरा, ब्रम्हपूरी आणि भद्रावती-वरोरा विधानसभा मतदार संघ काॅंग्रेसकडे असून बल्लारपूर आणि चिमूर भाजपा तर चंद्रपूर विधानसभा मतदार संघात अपक्ष आमदार आहे. त्यामूळे उमेदवारी वाटपाच्या चढाओढीत बल्लारपूर, चिमूर आणि चंद्रपूर विधानसभा मतदार संघाच्या उमेदवारी करीता राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टीचा शरद पवार गट आणि शिवसेनेचा उबाठा गट आग्रही राहण्याची शक्यता आहे. हे जरी खरं असलं तरी बल्लारपूर विधानसभा मतदार संघाच्या उमेदवारी करीता काॅंग्रेस पार्टीमध्यें चढाओढ दिसून येत आहे. मागील विधानसभा निवडणुकीत पराभव पचवणारे बल्लारपूरचे माजी नगराध्यक्ष घनश्याम मुलचंदानी पुन्हा आमदारकीसाठी नशिब अजमावणार असल्याचे दिसून येत आहे. सुधीर मुनगंटीवार यांचेकडूनचं मुलचंदानी यांचा पराभव झाला असल्याने काॅंग्रेस पक्षश्रेष्ठी पुन्हा त्यांचा नावांचा विचार करेल किंवा नाही ? हे निश्चित नाही. मुलचंदानी पाठोपाठ जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत, भुमीपुत्र ब्रिगेडच्या संस्थापक डाँ. अभिलाषा गावतुरे, कृषी उत्पन्न बाजार समिती चंद्रपूरचे माजी सभापती दिनेश चोखारे, जि.प.चे माजी अध्यक्ष प्रकाश मारकवार, माजी उपाध्यक्ष विनोद अहीरकर, चंद्रपूर महानगर पालीकेचे माजी सभापती नंदु नागरकर, उलगुलानचे संस्थापक राजु झाडे, बहुजन समता पर्वाचे डाॅ. संजय घाटे आदि उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचे दिसून येत आहे. डाॅ. अभिलाषा गावतुरे, डाॅ. संजय घाटे, विनोद अहीरकर, प्रकाश मारकवार, नंदु नागरकर बहुजन आणि ओबीसी समाजाच्या नावांने पक्षनेतृत्वाकडे प्रयत्नरत असतांना मात्र अल्पसंख्याक असलेले संतोषसिंह रावत यांनी केलेल्या विविध कार्याच्या शिदोरीवर उमेदवारीवर दावा करणार आहेत. 2007 ते 2009 पर्यंत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहीलेले संतोषसिंह रावत यांचा बल्लारपूर विधानसभा मतदार संघातच नव्हे तर जिल्हयातील अनेक गावात जिल्हा परिषदेच्या अनेक योजना त्यांनी गांवागावांत राबविल्या आहेत. 2002 पासून चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक असलेले संतोषसिंह रावत सप्टेंबर 2020 पासून बॅंकेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. बॅंकेच्या अध्यक्ष पदाच्या कार्यकाळातही त्यांनी शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या व विकासाच्या अनेक योजना सहकारी संचालक वृंदाच्या सहकार्याने कार्यान्वीत केल्या असून कोरोना काळात मूल तालुक्यात केलेले त्यांचे कार्ये लोकाभिमुख आहे. मूलच्या नगराध्यक्ष पदापासून बाजार समितीचे सभापती पद भुषविणारे संतोषसिंह रावत यांचे युवाशक्ती व्यायाम मंडळाचे माध्यमातून क्रिडा तर श्री माॅ दुर्गा मंदिर सेवा समिती आणि श्री हनुमान देवस्थानच्या माध्यमातून धार्मिक कार्ये अविरत सुरू आहे. प्रकाश मारकवार आणि विनोद अहीरकर यांनीही जिल्हा परिषदेचे महत्वाचे पद भुषविले असून दोघांनीही यापुर्वी विधानसभेची निवडणुक लढविली. त्यात त्यांचा पराभव झाल्याने त्यांची उमेदवारीसाठीची दावेदारी किती काळ टिकेल. हे सध्यातरी सांगता येणार नाही. डाॅ. अभिलाषा गावतुरे, दिनेश चोखारे, डाॅ. संजय घाटे, नंदु नागरकर आणि राजु झाडे हे ओबीसी आणि बहुजन समाजाचे कार्यकर्ते म्हणून उमेदवारीवर दावा ठेवून आहेत. त्यामूळे होणा-या विधानसभा निवडणुकीत उमेदवारीची माळ काॅंग्रेस पक्षाच्या गळयात पडते कि महाविकास आघाडीमध्यें युतीधर्म पाळला जातो. याकडे तीनही पक्षाच्या कार्यकर्त्याचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here