नरभक्षक वाघाच्या दहशतीत असलेल्या ग्रामस्थांनी घेतली मुख्य वनसंरक्षकांची भेट, मागण्यांची पुर्तता न केल्यास आंदोलन करू. संतोषसिंह रावत यांचा इशारा

16

*नरभक्षक वाघाच्या दहशतीत असलेल्या ग्रामस्थांनी घेतली मुख्य वनसंरक्षकांची भेट*

*मागण्यांची पुर्तता न केल्यास आंदोलन करू. संतोषसिंह रावत यांचा इशारा*

मूल : शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये दहशत पसरविणाऱ्या नरभक्षक वाघांचा तातडीने बंदोबस्त करावा, गुरे चारण्यासाठी चराई क्षेत्र निर्माण करण्यात यावा, नरभक्षक वाघाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबातील एका व्यक्तीला वनविभागा अंतर्गत नोकरी देण्यात यावी, मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या परिवाराला ७५ लाख व जखमी व्यक्तीला २५ लाख रुपयांची तातडीने मदत देण्यात यावी. आदी मागण्यांच्या पूर्ततेसाठी तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज मुख्य वनसंरक्षक यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांचे नेतृत्वात नरभक्षक वाघाच्या हल्ल्याने त्रस्त असलेल्या तालुक्यातील केळझर, फुलझरी चिचाळा, मरेंगाव, ताडाळा, सुशी दाबगांव येथील शेकडो कार्यकर्त्यांनी आज चंद्रपूरचे मुख्य वनसंरक्षक जितेंद्र रामगावकर यांची प्रत्यक्ष भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले. मागील काही दिवसांपासून तालुक्यातील अनेक गावात नागरिक नरभक्षक वाघाच्या दहशती मध्ये वावरत आहेत. वाघा शिवाय बिबट, रानडुक्कर यांचे दिवसागणीक दर्शन होत असल्याने गावातील शेकडो नागरीकांनी जीवाच्या काळजीपोटी शेती न करण्याच्या निर्णय घेतला असून जंगला लगतच्या अनेक गावातील शेकडो हेक्टर शेती पडीत आहे. यामुळे शेती पडीत ठेवलेल्या कुटुंबांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. गुरे चारण्यासाठी चराई क्षेत्र आरक्षित ठेवण्यात न आल्याने गुरे चारायची कोठे ? असाही प्रश्न त्यांचे समोर निर्माण झाला असून वन्य प्राण्यांच्या भीतीपोटी शेतकऱ्यांचे गोधन ही दिवसेंदिवस कमी होत असल्याने देशाच्या कणा असलेला शेतकरी संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत वनविभागाने संकटात सापडलेल्या शेतकरी व नागरिकांना सहकार्याच्या हात द्यावा. अशी विनंती काँग्रेस नेते संतोषसिंह रावत यांनी मुख्य वनसंरक्षक रामगावकर यांना केली.
सादर केलेल्या निवेदनातील मागण्यांवर चर्चा करताना मुख्य वनसंरक्षक रामगावकर यांनी आठवड्याभरात नरभक्षक वाघाच्या बंदोबस्त करण्यासंबंधी पाऊले उचलले जातील असे आश्वासन दिले. वाघाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या व जखमी झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला देण्यात येणारी मदत वाढवून मिळावी याकरिता शासनाकडे निवेदना नुसार प्रस्ताव सादर करण्याची ग्वाही देतांना रामगावकर यांनी शेत पिकांची नुकसान करणाऱ्या रानडुकरांना मारण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी यांचे मार्फतीने विनंती केल्यास 24 तासात कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले. जंगलात वन्य प्राण्यांना तहाण भागवता यावी म्हणून असलेल्या पाणवठ्यात पुन्हा वाढ करण्यात येईल, वनविभाग अंतर्गत कार्यरत असलेल्या वन अधिकारी व कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचे तातडीने निर्देश देण्यात येईल, वाघाचा हल्ल्याच्या घटनेचे 24 तासाच्या आत पंचनामे करण्यात यावे, पंचनामे करण्यास वेळकाढूपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर तातडीने कार्यवाही करण्यात येईल, असेही आश्वासन रामगावकर यांनी दिले. यावेळी विभागीय वन अधिकारी प्रशांत खाडे यांचे शिवाय तालुका काँग्रेसचे अध्यक्ष गुरु गुरनुले, शहर अध्यक्ष सुनील शेरकी, मूल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राकेश रत्नावार, संचालक संदीप कारवार, किशोर घडसे, राजू मारकवार, सरपंच आकापूर भास्कर हजारे, सरपंच चिमढा कालिदास खोब्रागडे, कांतापेठच्या सरपंचा वैशाली निकोडे, मरेगांवच्या सरपंचा जोस्तना पेंदोर, टोलेवाहीचे उपसरपंच विकास येळमे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पवन निलावार, प्रशांत उराडे, डॉ. पद्माकर लेनगुरे यांचेसह नरभक्षक वाघाच्या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या व्यक्तींचे नातेवाईक, ग्रामस्थ व काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here