पिक विमा आणि रेतीसाठी शिवसेनेचा उबाठा गट आग्रही, शेतकरी आणि गरजवंतासाठी दिले प्रशासनाला निवेदन

34

मूल : शेतीच्या हंगाम तोंडावर असतांना तालुक्यातील हजारो शेतक-यांना अद्यापही पिक विम्याचा लाभ मिळालेला नाही, त्यामूळे पिक विम्याच्या लाभापासून वंचित असलेल्या शेतक-यांना पिक विमा तातडीने देण्यात यावा तसेच रखडलेले घरकुलाचे बांधकाम पुर्ण करण्यासाठी रेती उपलब्ध करून दयावी. अशी मागणी शिवसेनेच्या उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे आणि तालुका प्रमुख प्रशांत गट्टुवार यांचे नेतृत्वात स्थानिक पदाधिका-यांनी तालुका प्रशासनाकडे केली आहे.

तहसिलदार यांचे मार्फतीने राज्याचे मुख्यमंत्री यांना पाठविलेल्या निवेदनात राज्यात झालेला अवकाळी पाऊस आणि सततच्या दुष्काळामूळे राज्यातील असंख्य शेतक-यांचे मोठया प्रमाणांत नुकसान झाले. त्यामूळे नुकसानग्रस्त शेतक-यांना मदत करता यावी म्हणून राज्य शासनाने आदेश दिले. परंतू दिलेल्या आदेशात धान पिक वगळल्याने धान उत्पादक शेतकरी प्रचंड अडचणीत सापडला आहे. सोयाबीन, कापुस व अन्य कडधान्य उत्पादनासोबतचं अवकाळी पावसाचा फटका धान पिकालाही बसला. त्यामूळे नुकसान भरपाईच्या आदेशात शासनाने धान पिकाचा समावेश करून नुकसानग्रस्त धान उत्पादकांना तातडीने पिक विम्याचा लाभ देण्यासंबंधी संबंधीतास निर्देश दयावे. असे नमुद आहे. निवा-याविना असलेल्या कुटूंबाला निवारा उपलब्ध करून दयावा म्हणून शासनाने गरजु कुटूंबाला घरकुल मंजुर केले. शासनाकडून घरकुल मंजुर झाल्याने सुखावलेल्या कुटूंबाने पैश्याची जुळवा जुळव करून घरकुल बांधकामास सुरूवात केली परंतू तालुक्यातील रेती घाटांचे लिलाव न झाल्याने घरकुल बांधकामासाठी आवश्यक असलेली रेती डपलब्ध होत नसल्याने घरकुलाचे अनेक बांधकाम थांबलेले आहेत. घरकुल पुर्ण होत नसल्याने अनेक कुटूंब उघडयावर आले आहे. पावसाळा तोंडावर आला असून ऐन पावसाळयात उघडयावर पडलेल्या कुटूंबाला निवारा दयायचा कसा. ही गंभीर समस्या त्यांचे समोर निर्माण झाली आहे. त्यामूळे अपुर्ण असलेले घरकुलाचे बांधकाम पुर्ण करण्यासाठी रेती उपलब्ध करून दयावी व लिलावाविना असलेले रेती घाटाचे तातडीने लिलाव करण्यांत यावे. अशीही मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने केली आहे. जिल्हा प्रमुख संदीप गि-हे आणि तालुका प्रमुख प्रशांत गट्टूवार यांचे नेतृत्वात तहसिलदार मोरे यांना भेटलेल्या शिवसेनेच्या शिष्टमंडळात शहर प्रमुख आकाश राम, विभाग प्रमुख चेतन मुंगमोडे, ऋतीक मेश्राम, विनोद चलाख, महेश चैधरी, सुनिल काळे, अमित आयलानी, विजय शेंडे, चेतन जाधव, शोएब शेख आदि पदाधिकारी सहभागी होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here