पंधरा दिवसात पाच जणांचा बळी घेणाऱ्या हल्लेखोर वाघांचा बंदोबस्त करावा, संतोषसिंह रावत यांचा आंदोलनाचा इशारा

20

मूल : पंधरा दिवसाच्या कालावधीत तालुक्यातील पाच जणांचा वाघाच्या हल्ल्यात जीव गेला. त्यामूळे जनसामान्यांमध्ये वाघाची दहशत निर्माण झाली असून जीवघेण्या वाघांचा बंदोबस्त करावा. अशी जनमागणी होत आहे. असे असतांना वनविभाग मात्र जनतेच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. ही बाब गंभीर असून जनभावनांशी खेळण्याचा प्रकार असल्याचा आरोप काँग्रेस नेते संतोषसिंह रावत यांनी केला असून येत्या सात दिवसात हल्लेखोर वाघांचा बंदोबस्त न केल्यास तिव्र आंदोलन करण्यांत येईल. असा इशारा दिला आहे.

प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात काँग्रेस नेते संतोषसिंह रावत यांनी मागील पंधरा दिवसाच्या कालावधीत वाघाने हल्ला करून बेलघाटा येथील सेवक सयाजी कोवे (55), केळझर येथील गणपत लक्ष्मण मराठे (60), चिचाळा येथील मुनीम रतीराम गोलावार (41) जानाळा येथील गुलाब हरी वेळमे (52) आणि वासुदेव झिंगरू पेंदोर (60) रा. मरेगांव या पाच जणांचा जीव घेतला. वाघाने हल्ला करून पाच जणांचा जीव घेतल्याने पंधरा दिवसाच्या कालावधीत पाच कुटूंब निराधार झाले. वाघाच्या हल्ल्याने निराधार झालेल्या कुटूंबाला वनविभागाने तात्पुरती आर्थिक मदत केली परंतू करण्यांत आलेली मदत तोकडी असून कुटूंबाचा कर्ता पुरूष गमावल्याने त्यांचे समोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. मागील काही दिवसांपासून हल्लेखोर वाघ जंगला लगतच्या गावांतच नव्हे तर मूल शहर आणि अनेक गावांच्या आजुबाजुला नागरीकांना दिसत असल्याने तालुक्यात भितीचे वातावरण पसरले असुन वाघाच्या भितीने जनजीवन विस्कळीत झाल्याचे दिसून येत आहे. शेतीच्या ऐन हंगामात वाघाचे हल्ले वाढले असून प्रत्येक दिवशी कोणत्या ना कोणत्या गांवात नागरीकांना वाघ दिसत असल्याने शेती करायची कशी ? गुरे चारण्यासाठी न्यायचे कसे ? शहरातून स्वगांवी परत जायचे कसे ? असे अनेक प्रश्न जनसामान्यांमध्यें चर्चील्या जात आहे. शेतीच्या हंगामात वाघाचे हल्ले वाढल्याने अनेक शेतकऱ्यांनी जीव गमावण्या पेक्षा शेती न केलेली बरी. म्हणत शेती पडीत ठेवली आहे. त्यामूळे वन विभागाने हल्लेखोर वाघांचा तातडीने बंदोबस्त करून नागरीकांना भयमुक्त करावे. अन्यथा सतत होत असलेल्या वाघाच्या हल्ल्याने त्रस्त झालेले नागरीक संघटीत होवून वाघाचा बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही. असे मत व्यक्त केले असून येत्या आठवडया भरात हल्लेखोर वाघाचा वनविभागाने बंदोबस्त न केल्यास काॅंग्रेस पक्षाच्या वतीने वन विभागाच्या कार्यालयासमोर तिव्र आंदोलन करण्यांत येईल. असा इशारा संतोषसिंह रावत यांनी निवेदनातुन दिला आहे. निवेदनाच्या प्रती वन विभागाचे वरीष्ठ अधिकारी, वन मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचेसह राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनाही पाठविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here