मूल : राज्यातल्या राजकारणात खुर्चीसाठी हपापलेल्या नेत्यांनी चिखल पसरविला असून येत्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील सुज्ञ जनता महाराष्ट्राला राजकीय चिखलातून मुक्त करतील. असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटाचे प्रवक्ते नितेश कराडे यांनी व्यक्त केला.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत मित्र परिवाराचे वतीने आयोजित तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरव सोहळा तथा विद्यार्थी मेळाव्याच्या निमित्ताने मुल येथे आले असताना स्थानिक विश्रामगृहात ते पत्रकारांशी बोलत होते. राज्यातील सत्तेची खुर्ची गेल्यानंतर राज्यातील काही सत्तापिपांसु नेत्यांनी केंद्र शासनाच्या अधिपत्याखालील ईडी, सीआयडी, सीबीआय आदी यंत्रणाच्या गैरवापर करून काही जणांना भिती दाखवली. त्यांच्या भितीला बळी पडुन राज्यातील काही घाबरट आणि भ्रष्टाचारी नेत्यांनी सत्तापिंपासूनच्या नाद स्स्विकारला, ज्या पक्षाच्या नावाने वर्षानुवर्षे सत्ता उपभोगली त्या पक्षाच्या नेत्यांवर निराधार आरोप करत पक्षाचा त्याग केला. हा सर्व प्रकार राज्यातल्या एकेकाळच्या सुसंस्कृत राजकारणाला कलंक लावणारा आहे. असा आरोप केला. दोन अडीच वर्षापासून राज्यातल्या राजकारणात जे जे घडत आहे, त्या घडामोळी अत्यंत घृणास्पद असून सुज्ञ मतदारांना न आवडणारे आहे. याच्या परिणाम झालेल्या लोकसभा निवडणुकीत दिसून आला असून येत्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा बदल घडणार. हे निश्चित आहे असा दावा नितेश कराळे यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रथमच कर्मवीर कन्नमवारांच्या कर्मभूमीत येण्याची संधी मिळाली. याविषयी समाधान व्यक्त करतांना नितेश कराळे यांनी संतोषसिंह रावत परिवाराने घेतलेला सामाजिक उपक्रम कौतुकास्पद असल्याने मत व्यक्त केले. पुढे बोलताना नितेश कराळे यांनी महाविकास आघाडीकडून संतोषसिंह रावत यांना पक्षाने अधिकृत उमेदवारी दिल्यास त्यांच्या निवडणूक प्रचारार्थ येण्याची ग्वाही दिली. यावेळी संतोषसिंह रावत यांचे शिवाय कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राकेश रत्नावार, उपसभापती राजेंद्र कन्नमवार, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गुरु गुरनुले, मूल शहर अध्यक्ष सुनील शेरकी, घनश्याम येनुरकर, राजु मारकवार, प्रशांत उराडे, पवन निलमवार आदी काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.