आठ महीण्यापासुन विज बिल न भरल्याने आर.ओ.केंद्र बंद, केंद्र संचालकाकडून जबाबदारी टाळण्याचे प्रयत्न

73

मूल : वारंवार सुचना देवूनही आर.ओ.केंद्र व्यवस्थापनाने आठ महीण्यापासुन थकीत विज बिलाचा भरणा न केल्याने विज पुरवठा खंडीत करण्यांत आला असून आर.ओ.केंद्र संचालक आपल्या चुकीचे खापर ग्राम पंचायतीवर फोडत असल्याचा आरोप सरपंच आणि ग्राम सेवक यांनी केला आहे.

आरोग्याच्या दृष्टीने चिरोली वासीयांना 2 रूपयात 20 लिटर शुध्द आणि थंड पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी राईट वाॅटर सोल्युशन इंडिया कंपनीने जबाबदारी स्विकारली. ग्राम पंचायतीच्या परवानगीने केळझर मार्गावरील मोक्याचे जागेवर आर.ओ.केंद्र निर्माण केल्यानंतर आवश्यक असलेली विजेची जोडणी करण्यांत आली. तेव्हापासून काल परवा पर्यंत येथील आर.ओ.केंद्र एक दोन दिवसांचा अपवाद वगळता सुरळीत सुरू होते. परंतू मागील दहा दिवसांपासून सदर आर.ओ.केंद्र बंद असल्याने चिरोली वासीय थंड आणि शुध्द पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहेत. बंद असलेले आर.ओ. केंद्र जनतेच्या सोयीसाठी सुरू करावे, अशी मागणी होत असतांना संबंधीत यंत्रणा ग्रामस्थांच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत आहेत. बंद असलेल्या आर.ओ केंद्राचे व्यवस्थापन सांभाळणारे राईट वाॅटर सोल्युशन इंडिया कंपनीचे अंकुश मालवीय यांना विचारले असता उत्पन्न आणि अपेक्षे पेक्षा विज बिल जास्त आले असून आलेले विज बिल कमी करून मिळावे म्हणून पाठपुरावा करीत आहे. परंतू अजून पर्यंत विज बिल कमी करून मिळालेले नाही, त्यामूळे आर.ओ.केंद्र बंद असून यासाठी ग्राम पंचायती कडून आवश्यक सहकार्य मिळत नसल्याचे सांगीतले. आर.ओ. केंद्र सुरू करण्यासाठी आवश्यक असलेली विज जोडणीकरीता ग्राम पंचायतीने ना हरकत दिले परंतू चार वर्षापासून सुरू असलेले आर.ओ.केंद्र आजपर्यंत ग्राम पंचायतीकडे स्वाधीन करण्यांत आले नाही. त्यामूळे सुरूवातीपासून आजपर्यंत आर.ओ.केंद्राची देखरेख व निगा राखण्याची जबाबदारी राईट वाॅटर सोल्युशन इंडिया कंपनीकडे आहे. त्यामूळे बंद असलेले आर.ओ.केंद्र सुरू करण्यासाठी सदर कंपनी व्यवस्थापनाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. आर.ओ.केंद्र चालविण्यासाठी वापरलेल्या विजेचे बिल भरमसाठ आल्याचा आरोप व्यवस्थापक करीत असले तरी थ्री फेज विज पुरवठा असलेल्या केंद्राचे जानेवारी महिण्यापासून आजपर्यंत एकाही महिण्याचे विज बिल न भरल्याने 20 हजार 920 रूपये बिल येणे स्वाभाविक असल्याचे मत विज वितरण कंपनीच्या अधिका-यांनी सांगीतले. विज बिल न भरल्याने बिलाचा आकडा पाच अक्षरी झाला, नियमित बिलाचा भरणा केला असता तर आकडा पाच अक्षरी झालाच नसता. याकरीता आर.ओ.केंद्र संचालक जबाबदार असून जबाबदारी टाळण्याचा प्रकार आर.ओ.केंद्र व्यवस्थापना कडून होत असल्याचा आरोप केल्या जात आहे. दरम्यान जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने आर.ओ.केंद्र सुरू करण्यासाठी तातडीने प्रयत्न करण्यात यावे. अन्यथा आंदोलनात्मक मार्ग स्विकारावा लागेल. असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here