मूल बस स्थानका मधील महीला प्रसाधन गृहात दुर्गंधी व घाणीचे साम्राज्य, सुधारणा न झाल्यास दिला आंदोलनाचा इशारा

23

मूल : प्रवासी आणि बसेसच्या गर्दीने भरून राहणा-या येथील बस स्थानकाच्या भिंतीची रंगरंगोटी करून प्रवाश्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न होत असतांना दुसरीकडे मात्र येथील प्रसाधन गृहाची दुरावस्था बघून महामंडळाच्या अधिका-यांच्या प्रयत्नावर पाणी फेरल्या जात असल्याचा प्रकार येथील बस स्थानकामध्ये दिसुन येत आहे.

जिल्हयाच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले येथील बस स्थानक सदैव प्रवाशी आणि बसेसच्या गर्दीने भरलेले असते. दररोज हजारो प्रवाशी येथून ये-जा करतात. त्यामूळे येथील बस स्थानकावर पुरेश्या प्रमाणात शौचालयाची व्यवस्था असावी. या मागणीची दखल घेवून महामंडळ प्रशासनाने शौचालयात पुरेश्या प्रमाणांत मुता-या निर्माण केल्या. निर्माण केलेल्या शौचालयात स्वच्छता आणि दुर्गधी येवू नये म्हणून पाण्याच्या व्यवस्थेसह देखरेख ठेवण्यासाठी महामंडळाने येथील शौचालयाचा कंत्राट नागपूर येथील राजकुमार नामक व्यक्तीला देण्यात आला. कंत्राट आदेशातील अटी आणि शर्ती नुसार कंत्राटदाराने प्रारंभीच्या काळात शौचालयाची निगा आणि देखरेख ठेवण्याचा प्रयत्न केला. कालांतराने मात्र कंत्राटदाराचे शौचालयाच्या स्वच्छता आणि व्यवस्थेकडे दुर्लक्ष होवू लागल्याने मागील कित्येक महिण्यांपासून येथील महिला शौचालयात पाण्याची व्यवस्था नसल्याने घाणीचे साम्राज्य पसरले आहे. नियमित स्वच्छता होत नसल्याने शौचालयात दुर्गधी पसरली असून तोंड आणि नाकावर कापड ठेवून महिला प्रवाश्यांना अडचण भागवावी लागत आहे. महिलांकरीता निर्माण केलेले हिरकणी कक्ष महिला शौचालयाला लागून असल्याने शौचालयातील अस्वच्छता आणि दुर्गंधीमूळे हिरकणी कक्ष असुन नसल्या सारखे झाले आहे. मागील पाच दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमूळे स्थानकातील महिला प्रसाधन गृहात घाणीचे साम्राज्य पसरले असून मोठया प्रमाणांत दुर्गधी येत असली तरी नाईलाजाने प्रसाधनगृहाचा वापर करावा लागत आहे. त्यामूळे महिला प्रवाश्यांमध्यें येथील प्रसाधन गृहाच्या दुरावस्थे विषयी प्रचंड असंतोष पसरला आहे. संबंधीत विभागाने महिलांच्या समस्येकडे तातडीने लक्ष पुरवावे अशी मागणी केल्या जात आहे.

येथील महिला प्रसाधन गृहातील दुरावस्था, अस्वच्छता आणि दुर्गंधी बाबत अनेक महिलांनी तक्रारी केल्या. त्याबाबत वरीष्ठांना कळविले सोबतचं शौचालयाच्या कंत्राटदारालाही सांगीतले. परंतू कोणीही प्रसाधन गृहाची दुरावस्था दुर करण्यासाठी सहकार्य करीत नाही. त्यामूळे आमचाही नाईलाज आहे.
वाहतुक नियंत्रक, बस स्थानक मूल

नेहमीप्रमाणे बस स्थानकामधील मंदिरात दर्शना करीता गेलो असता महिला प्रसाधन गृहातील दुरावस्थेविषयी काही महिलांनी सांगीतले. ही बाब अत्यंत संतापजनक असून महिलांच्या भावनांशी खेळण्याचा आहे. तातडीने येथील महिला आणि पुरूष प्रसाधनगृहाची स्वच्छता आणि देखरेखीचा निर्णय घेण्यात यावा. अन्यथा काॅंग्रेसच्या वतीने महिलांच्या सोयीसाठी आंदोलन करावे लागेल.
संतोषसिंह रावत,
अध्यक्ष जि.म.स.बॅंक चंद्रपूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here