अतिवृष्टीचे तात्काळ पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करावा-सर्वपक्षीय नेत्यांची मागणी. प्रशासनाच्या अहवालाकडे शेतकऱ्यांचे लक्ष

19

मूल : संततधार पावसामुळे तालुक्यातील हजारो हेक्टर शेती पाण्याखाली आली असून शेतातील पीक उध्वस्त झाले आहे. शेतातील यंत्र सामुग्री, खत वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे लाखोचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील अनेक गांव आणि मूल शहराच्या अनेक भागातील नागरी वस्तीमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने अनेकांच्या घरांचे नुकसान झाले असून पाण्यामुळे साहित्य वाहून गेली आहे. कर्जाच्या ओझाखाली वावरणारा तालुक्यातील शेतकरी नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे पुन्हा कर्जाच्या ओझ्याखाली आला आहे. शेतातील रोवलेले धान, टाकलेल्या आवत्या पाण्यात वाहून गेल्याने शेकडो शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. आर्थिक अडचणीमुळे दुबार पेरणी करायची कशी ? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाल्यामुळे अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक परिस्थितीची व नुकसानीची प्रत्यक्ष व वास्तविक पाहणी व पंचनामे करून शेतकरी व नागरिकांना शासनाने तातडीने मदतीचा हात द्यावा मूल व पोंभुर्णा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा. अशी मागणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा काँग्रेस नेते संतोषसिंह रावत यांनी जिल्हाधिकारी यांचे कडे केली आहे.

सतत तीन दिवसापासून मुसळधार पाऊस कोसळल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसानीला सामोरे जावे लागले. नदी व नाल्यांच्या काठावरील शेतकऱ्यांचे रोवलेले रोवणे, प-हे वाहून गेले असून कापूस सोयाबीन व भाजीपाला लागवडीलाही अतिवृष्टीच्या फटका बसला आहे. त्यामुळे मूल तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा व शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष मंगेश पोटवार यांनी तहसीलदार यांना भेटून निवेदनाद्वारे केली आहे.

संततधार पावसामुळे बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील शेताची व नागरी वस्तीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असुन शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. अनेक गावं व शहरातील वार्डामध्ये पाणी शिरून नागरिकांचे बेहाल झाले असून अनेकांचे घर पडली तर अनेकांचे साहित्य निकामी झाल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे, त्यामुळे महसूल प्रशासनाने संबंधित विभागाच्या सहकार्याने नुकसानग्रस्त परिसराची प्रत्यक्ष पाहणी व मौका पंचनामे करून नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत जाहीर करावी. अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी मुख्यमंञ्यांना पाठविलेल्या निवेदनातुन केली आहे.

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष चौकशी करून येत्या पंधरा दिवसात शासनाने नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत जाहीर न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा शिवसेना उबाठा गटाचे तालुका प्रमुख प्रशांत गट्टुवार यांनी दिला आहे.

तालुक्याच्या राजकारणात सक्रीय असलेल्या विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी तालुक्यात झालेल्या अतीवृष्ठीची दखल घेवुन ओला दुष्काळ जाहीर करून नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत जाहीर करावी. अशी मागणी केल्याने तालुका महसुल प्रशासन सक्रीय झाल्याचे दिसुन येत आहे. ओला दुष्काळ जाहीर करण्यासंबंधी प्रशासन कोणता निर्णय जाहीर करते. याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here