मूल : रूग्णांच्या उपचारा करीता निर्माण करण्यांत आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकिय अधिकारी निर्धारीत वेळेत हजर न राहता उशीराने हजर होत असल्याने रूग्णांना त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार राजोली येथील सरपंच जितेंद्र लोणारे यांनी केली वरीष्ठांकडे केली आहे.
वातावरणातील उष्णतेमूळे परीसरातील नागरीक आरोग्याच्या दृष्टीने त्रस्त आहेत. त्यामूळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्याकरीता दिवसेंदिवस रूग्णांची संख्या वाढत आहे. आज सकाळी 8 वाजता पासून मोठया संख्येने रूग्ण आरोग्य केंद्रात उपचारा करीता हजर झाले. परंतू तास दिड तास होवूनही कर्तव्यावरील वैद्यकिय अधिकारी हजर न झाल्याने उपचारा करीता आलेल्या रूग्णांना उपचार करण्यास उशीर झाला. उन्हाच्या दाहकतेमधून सुरक्षीत राहण्याकरीता प्रत्येकाला लवकर उपचार करून घरी जाण्याची घाई होती. परंतू वैद्यकिय अधिकारी उशीरा पर्यंत उपस्थित न झाल्याने आजारी असलेल्या रूग्णांना शारिरीक व मानसिक दृष्टया त्रास सहन करावा लागला. उपचारा करीता गेलेल्या रूग्णांनी सदर प्रकाराची तक्रार सरपंच म्हणून आपल्याकडे केली तेव्हा आपण काही सहका-यांसह प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहोचलो. तेव्हा केंद्रात मोठया संख्येने रूग्ण होते परंतू नियुक्त असलेल्या दोन पैकी एकही वैद्यकिय अधिकारी सेवेत दिसला नाही. ही बाब अयोग्य असून रूग्णांना सेवा देण्याकरीता रूजू झालेल्या वैद्यकिय अधिका-यांनी रूग्णांना सेवा देणे अपरिहार्य आहे. येत्या काही दिवसात राजोली येथे नव्याने बांधण्यात आलेल्या प्रशस्त प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण होणार आहे. त्यामूळे आज उद्भवलेली परिस्थिती नवीन इमारतीमध्यें उद्भवू नये. अशी अपेक्षा आहे. अन्यथा जनतेच्या हक्कासाठी आंदोलन करावे लागेल. असा इशारा सरपंच जितेंद्र लोणारे यांनी दिला.
उद्भवलेल्या परिस्थिती बाबत माहिती जाणुन घेतली असता प्राथमिक आरोग्य केंद्र राजोली येथे दोन वैद्यकिय अधिकारी नियुक्त आहेत. फार्मसिस्ट, ओपीडी सिस्टर आणि स्विपर हे महत्वाचे तीन पद मागील अनेक महिण्यांपासून रिक्त आहेत. दोन दिवसांपासून शासनाच्या वतीने 0 ते 6 वयोगटातील बालकांसाठी वजन महोत्सव सुरू आहे, या अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र राजोली येथील दोन्ही वैद्यकिय अधिका-यांची बालकांच्या आरोग्य तपासणी करीता नियुक्ती करण्यांत आली आहे. डाॅ. संकेत कवाडे यांची प्रकृती बरोबर नसल्याने डाॅ. तेरेसा बनसोड आज राजोली क्षेत्रातील अंगणवाडी केंद्रात बालकांच्या सुश्रृतेसाठी सकाळी 8.30 वाजता पासून उपस्थित होत्या. त्यामूळे डाॅ. तेरेसा बनसोड यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहोचण्याकरीता विलंब झाला. आज राजोली येथील आठवडी बाजाराचा दिवस असल्याने परिसरातील आबाल स्त्री पुरूष बाजाराच्या निमित्याने मोठया संख्येने राजोली येथे येवून प्रकृती दाखवत असतात. त्यामूळे आज सकाळ पासूनचं आरोग्य तपासणी करीता नागरीकांची संख्या मोठी होती. परंतू डाॅ. तेरेसा बनसोड स्क्रिनींग ड्राईव्ह शिबिरात उपस्थित होत्या तर डाॅ. संकेत कवाडे प्रकृती अस्वास्थामूळे रजेवर असल्याने सकाळी 9.30 वाजता पर्यंत आरोग्य केंद्रात वैद्यकिय अधिकारी हजर होवू शकले नाही. त्यानंतर मात्र डाॅ. तेरेसा बनसोड यांनी उपस्थित रूग्णांना नियमित सेवा दिली. राजोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्र राज्य मार्गावर असल्याने याठिकाणी येणा-या रूग्णांची संख्या मोठया प्रमाणांत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत येणा-या गांवाशिवाय याठिकाणी विरव्हा, लोनखैरी, सरडपार, पेटगांव, चिटकी आदि गावांतीलही नागरीक उपचारा करीता येत असतात. केद्राला जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाकडून जो औषध साठा उपलब्ध होतो तो केंद्रातील लोकसंख्येच्या आधारे उपलब्ध होतो परंतू निर्धारीत गांवाशिवाय इतर गावांतील जनता उपचारा करीता येत असल्याने आरोग्य केंद्रात नेहमी औषधींची टंचाई जाणवत असते. त्यामूळे जिल्हा प्रशासनाने प्राथमिक आरोग्य केंद्रात रिक्त असलेले पद तातडीने भरण्यात येवून नोंदणी होणा-या रूग्णांच्या संख्येत औषधसाठा उपलब्ध करून दिल्यास नागरीकांना अडचण जाणार नसल्याची चर्चा आहे.