मूल : चामोर्शी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे तथा गडचिरोली जिल्हा परीषदेचे माजी सभापती आणि सामाजिक कार्यकर्ते अतुल गण्यारपवार यांना केलेल्या अमानुष मारहाणीचा निषेध करत त्यांना मारहाण करणाऱ्या चामोर्शी येथील पोलिस निरीक्षक राजेश खांडवे यांचेवर कायदेशीर कारवाई करावी. अशी मागणी मूल तालुका आर्य वैश्य महासंघाचे वतीने करण्यात आली. मूलचे तहसिलदार डॉ. रविंद्र होळी यांचे मार्फतीने शासनाला आज समाजाचे वतीने निवेदन देण्यात आले.
पाच दिवसांपूर्वी चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अतुल गंगाधरराव गण्यारपवार यांना चामोर्शी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश खांडवे यांनी पहाटे ५ वाजता फोन करून पोलीस ठाण्यात येण्यास सांगीतले. त्याचेवर कोणताही गुन्हा नसतांना त्यांना अमानुष मारहाण केली. ही बाब अत्यंत अन्यायकारक आहे व घटनेच्या विरोधात असुन मानवी मुल्याची पायमल्ली करणारा प्रकार आहे. त्यामूळे सदर प्रकरणी पोलीस निरीक्षक राजेश खांडवे यांचेवर उचित कार्यवाही करून झालेल्या प्रकरणात त्यांना तात्काळ बडतर्फ करावे. या मागणीसह घटनेला पाच दिवस पूर्ण झाले असतांना चामोर्शी पोलीस निरीक्षक राजेश खांडवे यांचेवर कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. याचा निषेध यावेळी स्थानिक आर्य वैश्य समाजबांधवानी केला.
याप्रकरणी पोलीस निरीक्षक राजेश खांडवे यांच्या कृतीचे समर्थन करता येत नाही व त्यामुळे पोलीस विभागाचे सामान्य माणसाला संरक्षण नसुन दहशत निर्माण होऊ शकते, याकडे निवेदनातून शासनाचे लक्ष वेधण्यात आले आहे. निवेदन देतांना अजय गोगुलवार, गणेश पडगेलवार, विजय सिध्दावार, निलेश राँय सुनिल गोगीरवार, विवेक तुंडूरवार, संजय चिटमलवार, संजय चिंतावार, अनिल तुंडूरवार, सुनिल तोटावार, जितेंद्र रायकंटीवार, राजु मार्तीवार, गजानन कोलप्याकवार, धनजंय चिंतावार आदी मान्यवर उपस्थित होते.