मूल : कोठारी व पोंभुर्णा वनक्षेत्राअंतर्गत येत असलेल्या व मूल तालुक्यातील नांदगाव येथे शेतशिवारात विद्युत प्रवाहामुळे पट्टेदार वाघाचा मृत्यू झाला. ही घटना दिनांक ०६ फेब्रुवारी ला सकाळी ११ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. यामुळे वनविभागात खळबळ उडाली आहे.
नांदगाव पासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर अरुण मशारकर यांचे ६ एकर स्वमालकीचे शेत आहे. त्यांनी हे शेत नांदगाव येथील पुनाजी नाहगमकर यांना ठेका पद्धतीने दिलेले आहे. पुनाजी नाहगमकर हे गेल्या १० ते १२ वर्षांपासून शेती करीत असून ते खरीप व रब्बी हंगामात विविध पिके घेत आहेत. नेहमीप्रमाणे पुनाजी नाहगमकर यांचे चिरंजीव अंकुश हे सकाळी ११ वाजता शेतावर गेले असता पट्टेदार वाघ शेतीच्या तारेच्या कुंपणाजवळ मरून पडलेला दिसला. वाघ मृत्युमुखी दिसताच अंकुश घाबरला व काहीही न सुचल्यामुळे वाघावर धनपिकाची तनिस झाकून ठेवली. वनविभागाला ही माहिती होताच वनपरिक्षेत्राधिकारी फनींद्र गादेवार हे आपल्या चमुसह घटनास्थळावर उपस्थित झाले.व त्यांनी घटनेचा पंचनामा केला. वनाधिकारी यांनी याबाबत अंकुशची चौकशी केली असता शेतात हरभऱ्याचे पीक लावलेले असल्यामुळे हिंस्त्र व जंगली प्राण्यांपासून पिकाचे संरक्षण व्हावे म्हणून सायंकाळी कुंपणाविर शेतातील विद्युत खांबावरून विद्युत पुरवठा सोडला व तो घरी परतलो असे सांगितले. रात्रीच्या वेळेस वाघ शेतशिवरातुन संचार करीत असतांना विद्युत तारेला स्पर्श झाल्यामुळे व शरीरात विद्युत प्रवाह गेल्यामुळे वाघ जागीच ठार झाला. अंकुश नाहगमकर यांनी वणाधिकाऱ्यांजवळ कबुली दिलेली आहे.गुन्ह्याची कबुली दिल्यामुळे वनविभागाने अंकूशला ताब्यात घेतले आहे. वाघाची उत्तरीय तपासणी करून वाघाला पुरण्यात येणार असल्याची माहिती वणाधिकाऱ्यांनी दिली.
घटनास्थळी परिसरातील नागरिकांची वाघ पाहण्यासाठी अलोट गर्दी जमली होती. चौकशी दरम्यान वाघाच्या जवळ जाण्यास जाण्यास नागरिकांना मज्जाव करण्यात आलेला होता.त्यामुळे वनप्रशासनावर नागरिक रोष व्यक्त करीत होते. घटनास्थळी विज वितरण कंपनीचे अधिकारी यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी मूल पोलीस स्टेशनचे ठाणेदार सतिशसिंह राजपूत यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.