- मूल : तालुक्यातील गडीसुर्ला येथील प्रगत शेतकरी गिरीश आगरकाटे यांच्या बारा एकर शेतातील ५५५ स्वासीक प्रजातीच्या मौल्यवान धानाचे तीन पुजणे अज्ञात व्यक्तीने जाळल्याने गिरीश आगरकाटे यांचे ५ ते ६ लाखाचे नुकसान झाल्याची घटना आज घडली. गिरीश आगरकाटे यांनी यावर्षी स्वमालकीच्या बारा एकर शेतात ५५५ स्वासिक मौल्यवान धानाच्या वाणाची लागवड केली. चुरण्याला काही दिवस वेळ असल्याने शेतातच चार चार एकरचे तीन पुजने उभे करून ठेवले. काल दिनांक २० डिसेंबर २०२२ रोजी राञौची संधी साधून काही अज्ञात व्यक्तींनी उभ्या असलेल्या चारही धानाच्या पुजण्याला आग लावले. धान वाळला असल्याने क्षणात आगीने रौद्र रूप धारण केल्याने धानाचे तीनही पुजने जळून खाक झाले. पुजने जळल्याची माहीती आज पहाटे परीसरातील शेतकरी व गिरीश आगरकाटे यांना समजताच त्यांनी तात्काळ शेताकडे धाव घेतली असता तीनही पुजण्यांमधून हलक्या स्वरूपाचे आगीचे ज्वाला व धूर निघतांना दिसून आले. लावण्यात आलेल्या आगीत शेतमालक गिरीश आगरकाटे यांचे अंदाजे पाच ते सहा लाखाचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. पुजण्याला आग लावण्याची कृती अज्ञात व्यक्तींने काल रात्रीच्या वेळेला केली असावी, अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. काल तालुक्यातील ग्राम पंचायतीचा निकाल जाहीर झाला. शेतमालक गिरीश आगरकाटे यांच्या सहचारीणी भाजपाच्या सक्रीय पदाधिकारी आहेत. पार पडलेल्या निवडणुकीत त्या सक्रीय होत्या. त्यामूळे ग्राम पंचायत निकालाचा वचपा अज्ञात विघ्नसंतोषीने पूजणे जाळुन काढला असावा. अशी शंका व्यक्त केली जात आहे. सदर घटनेची माहिती होताच पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार पो.नि.सतीशसिंह राजपुत आणि पोलिस उपनिरीक्षक पुरूषोत्तम राठोड यांनी सहका-यांसह घटना स्थळी भेट देत पंचनामा केला. पुढील तपास त्यांनी चालविला आहे. शेतकऱ्यांच्या तोंडाचा घास जाळणाऱ्या आरोपींचा शोध घेवुन कठोर कारवाई करावी. आणि झालेल्या नुकसानाची शासनाने तात्काळ भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी गिरीश आगरकाटे व सौ वंदना आगरकाटे यांनी केली आहे.