प्रबोधनासोबतच संघटन बांधणीवर भर द्यावा – हरिभाऊ पाथोडे

107
चंद्रपूर:- माहिती तंत्रज्ञानाच्या डिजिटल युगात सुद्धा जादूटोण्याच्या संशयावरून  खून आणि धनप्राप्तीसाठी नरबळी सारखे प्रकार सातत्याने घडणे हे आधुनिक भारतीय समाजाची शोकांतिका असून यासंदर्भात अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती मागील चार दशकांपासून सातत्याने जनमानसाचे प्रबोधन करीत आहे. समितीच्या या अतिशय महत्त्वपूर्ण व काळाची गरज असलेल्या कार्याचा व्यापक प्रमाणात प्रभावी रित्या प्रचार प्रसार होण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रबोधना सोबतच संघटन बांधणीवर भर देण्याचे आवाहन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक हरिभाऊ  पाथोडे  यांनी केले. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीद्वारा स्थानिक वासनिक अकॅडमी येथे आयोजित जिल्हा बैठकीच्या अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते. याप्रसंगी समितीचे जिल्हाध्यक्ष एड. गोविंद भेंडारकर पर्यावरण तज्ञ आणि खगोलशास्त्राचे अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे, प्रसिद्ध बधिरिकरण तज्ञ डॉ. सलीम तुकडी, जिल्हा संघटक अनिल दहागावकर  जिल्हा सचिव धनंजय तावाडे, जिल्हा महिला संघटिका रजनी कार्लेकर , जिल्हा सहसचिव अनिल लोणबले, प्रा. संजय वासनिक  यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. पुढे बोलताना हरिभाऊ पाथोडे म्हणाले की गाव तेथे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कार्यकर्ता असणे गरजेचे आहे कारण अनेक गंभीर घटना या  ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांमुळे उघडकीस आल्या आहेत म्हणूनच गाव पातळीवर कार्यकर्ता तयार झाल्यास अंधश्रद्ध मानसिकतेतून घडणाऱ्या अनेक घटनांना आळा बसू शकेल. ऍड.गोविंद भेंडारकर यांनी अंधश्रद्धा निर्मूलन कार्याचे महत्त्व अधोरेखित करून जादूटोणाविरोधी कायदा सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत मांडले तसेच त्यांच्या प्रयत्नामुळे गोंडवाना विद्यापीठ हे जादूटोणाविरोधी कायदाचा अभ्यासक्रमाबाबत समावेश करणारे देशातील पहिले विद्यापीठ ठरल्याचे  त्यांनी सांगितले. प्रा.सुरेश चोपणे यांनी शालेय स्तरावर विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्मितीसाठी विविध उपक्रम राबविण्या राबविण्याचा मानस व्यक्त केला. डॉ. सलीम तुकडी यांनी याप्रसंगी आपले विचार व्यक्त केले. सदर बैठकीत अंधश्रद्धा निर्मूलन समितीला चाळीस वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने वर्षभर राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे नियोजन करण्यात आले. या बैठकीचे प्रास्ताविक अनिल दहागावकर यांनी केले. संचालन धनंजय तावडे यांनी तर रजनी कार्लेकर यांनी आभार प्रदर्शन केले. बैठकीच्या यशस्वीतेसाठी अविनाश आंबेकर, राजेश गावंडे,  अविनाश बलवीर,  पौर्णिमा बलवीर, सुरज सोनारकर, यशवंत  कायरकर,   डॉ. बी. शशिकांत, महेंद्र शेडमाके र्यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here