पालकमंत्र्यांच्या हस्ते वार्षिक प्रकाशनाचे विमोचन

110

जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन – 2022

चंद्रपूर, दि. 18 ऑक्टोबर : जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन – 2022 या प्रकाशनाचे जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते नियोजन समितीच्या बैठकीत विमोचन करण्यात आले. यावेळी खासदार अशोक नेते, आमदार किर्तीकुमार भांगडीया, जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, मनपा आयुक्त विपीन पालिवाल, जिल्हा पोलिस अधिक्षक अरविंद साळवे, जिल्हा सांख्यिकी अधिकारी अमित सुतार उपस्थित होते.

जिल्हा सांख्यिकी कार्यालयाच्यावतीने प्रकाशित या समालोचन मध्ये तीन भाग असून 11 प्रकरणे आहेत. प्रत्येक प्रकरणात जिल्ह्यातील विविध विषयांवरील विस्तृत आकडेवारी उपलब्ध आहे. जिल्ह्याच्या भौगोलिक माहितीसह काही ठळक बाबी प्रकाशनाच्या पहिल्या भागात दिल्या आहेत. तसेच चंद्रपूर जिल्हा व महाराष्ट्राची माहिती सुध्दा देण्यात आली आहे. दुस-या भागात जिल्ह्यातील विविध सामाजिक व आर्थिक क्षेत्राच्या स्थितीबाबतची माहिती सांख्यिकीय आकडेवारी तक्त्यांच्या स्वरुपात दिली आहे.

यात जिल्ह्यातील निवडक निर्देशांक, जिल्हा उत्पन्न अंदाज, जिल्ह्यातील किंमती व सार्वजनिक वितरण व्यवस्था, जमीन व इतर महसूल, स्थानिक स्वराज्य संस्थांचे उत्पन्न /खर्च, बँक व विमा, बचतगट, कृषी विषयक आकडेवारी, पदुम, जिल्ह्यातील जलसंपदा व लाभक्षेत्र, वने व पर्यावरण, उद्योग व सहकार, पणन, वस्त्रोद्योगबाबत आकडेवारी, पायाभुत सुविधांमध्ये उर्जा, प्रादेशिक परिवहन व दळणवळण, सार्वजनिक बांधकाम, पाणी पुरवठा व स्वच्छता विषयक आकडेवारी, सामाजिक क्षेत्रे व सामुहिक सेवा अंतर्गत शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, महिला व बालविकास, गृहनिर्माण, सामाजिक न्याय, अल्पसंख्यांक विकास, मदत व पुनर्वसनबाबत माहिती, योजनाविषयक आकडेवारीमध्ये विविध विकास योजना, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेबाबत आकडेवारी तसेच संकीर्ण मध्ये न्याय व प्रशासन, निवडणूकीबाबत, वित्त, पर्यटनाबाबत आकडेवारी आहे.

तिस-या व शेवटच्या भागात जनगणना, कृषीगणना, पशुगणना व आर्थिक गणनेबाबतची सांख्यिकिय तक्ते उपलब्ध करून देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील केंद्र पुरस्कृत योजना, राज्य शासनाच्या योजना, जिल्हा परिषदेकडील योजना, विशेष घटक योजना, आदिवासी घटक कार्यक्रम इत्यादी राबविण्यासाठी तसेच विविध शासकीय / निमशासकीय / खाजगी कार्यालये, शैक्षणिक संस्था, संशोधक, विद्यार्थी, नागरिक आदी घटकांना हे प्रकाशन उपयुक्त ठरेल. हे प्रकाशन अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या संकेतस्थळावर तसेच जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद, चंद्रपूर यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असे जिल्हा सांख्यिकी कार्यालयाने कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here