बळजबरीने रक्कम हिसकावणारे चार युवक मूल पोलीसांच्या ताब्यात

91

मूल : कर्जाच्या हप्त्याची रक्कम वसुल करून मोजत बसलेल्या वसुली प्रतिनिधींना दमदाटी देवून त्यांचे कडून रक्कम हिसकावून पळून जाण्याचा प्रयत्न करणा-या चार युवकांना मूल पोलीसांनी ताब्यात घेतल्याची घटना काल रात्रो शहरात घडली.

स्थानिक नवभारत विद्यालय समोर असलेल्या स्पंदनास्फुर्ती फायनान्स मायक्रो कंपनी मध्ये समीर बंडु बरडे आणि अतुल पांडूरंग सिंगारे हे वसुली प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. हे दोघेही कंपनी कडून घेतलेल्या कर्जाच्या हप्त्याची रक्कम वसुल करून परत आल्यानंतर जुन्या सोमनाथ मंदिरा समोरील ओटयावर बसून मोबाईलवर हप्ता वसुलीची एन्ट्री करत असतांना चार युवकांनी त्यांना घेरले. समीर बरडे आणि अतूल सिंगारे यांना धाक दाखवत त्यांचेजवळ असलेल्या बॅग मधून बळजबरीने २७ हजार रूपये हिसकावून घेतले. रक्कम हिसकावण्याचा प्रयत्न करतांना झालेल्या झटापटीत अतुल सिंगारे यांनी त्यांचेपासून सुटका करून घेत रेल्वे स्टेशन जवळ असलेल्या पानठेल्यावरील युवकांना घटना सांगीतली. घटनेची माहित होताच काही युवकांनी घटनास्थळी धाव घेत झटापट करीत असलेल्या चार युवकांपैकी एकाला पकडून ठेवत पोलीस स्टेशन येथे सुचना केली. घटनेची माहिती होताच पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचुन युवकाला ताब्यात घेत त्याचे कडून घेतलेल्या माहितीच्या आधारे पोलीसांनी काल रात्रो ११ वाजता नंतर मूल येथील कुणाल भिमानंद चिकाटे (२५) प्रथम प्रमोद गेडाम (२०) साहील पन्नालाल डोहणे (१९) आणि पंकज रविंद्र मोहुर्ले (२७) यांना ताब्यात घेवून त्यांचेविरूध्द कलम ३९२ अन्वये गुन्हा दाखल केला. तपासाअंती ताब्यात घेतलेल्या युवकांकडून हिसकावलेली पुर्ण रक्कम न मिळाल्याने पोलीस आज न्यायालयाला युवकांच्या पोलीस कोठडीची विनंती करणार असल्याचे समजते. घटनेचा पुढील तपास ठाणेदार सुमीत परतेकी यांचे मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक सतिश बंसोड सहकारी शफी शेख आणि देवकाते यांचे सहकार्याने करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here