लोकसभा मतदानाच्या दिवशी सुट्टी जाहीर, मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रशासनाची तयारी

44

मूल : भारत निवडणूक आयोगाने 16 मार्च 2024 रोजी जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात शुक्रवार १९ एप्रिल २०२४ मतदान होणार आहे. १८ वर्षावरील नोंदणी झालेल्या सर्व नागरिकांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी भारत निवडणूक आयोग यांच्या २२ मार्च २०२४ च्या परिपत्रकानुसार चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात १९ एप्रिल रोजी मतदान करण्यास सुटी जाहीर करण्यात आली आहे.

मतदानाच्या दिवशी सर्वसाधारणपणे मतदारांना त्यांच्या मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी सुट्टी देण्यात येते किंवा कामाच्या ठिकाणी योग्य ती सवलत देण्यात येते. मात्र गेल्या काही निवडणुकांमध्ये संस्था ,खासगी आस्थापना इत्यादी भरपगारी सुट्टी किंवा सवलत देत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अनेक मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागते. हे लक्षात घेता, या लोकसभा निवडणुकीत कामगार, अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी मिळणार आहे. ही सुट्टी उद्योग विभागांतर्गत येणाऱ्या सर्व उद्योग समूह, महामंडळे, कंपन्या व संस्था, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना आदींना लागू राहणार आहे. अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचाऱ्यांना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर, मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी कमीत कमी दोन तासांची सवलत दिली जाणार आहे. मात्र त्याबाबत संबंधित जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची परवानगी घेणे आवश्यक राहील.
कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन तासांची सवलत मिळेल, याची दक्षता संबंधित आस्थापनांनी घेणे आवश्यक राहणार आहे. उद्योग विभागांतर्गत येणारे सर्व महामंडळे, उद्योग समूह, कंपन्या व संस्थांमध्ये, औद्योगिक उपक्रम इत्यादींच्या आस्थापनांना या सूचनांचे योग्य अनुपालन होईल, याची काटेकोरपणे खबरदारी घ्यावी लागणार आहे. मतदानाच्या हक्कापासून कोणताही शासकीय कर्मचारी वंचित राहू नये, याकरिता निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने निवडणुकीच्या दिवशी सुट्टी जाहीर केली आहे. तसेच कार्यालय प्रमुख, अधिकारी, कर्मचारी, व्यावसायिक संस्था, व्यापारी केंद्र, औद्योगिक कारखाने इत्यादीमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या निदर्शनास ही बाब आणून देण्याचे देखील जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी सूचित केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here