मूल- सांस्कृतिक महामहोत्सवाच्या निमित्ताने आजपासुन तीन दिवस जनतेला झाडीपट्टीचा सांस्कृतिक मेवा चाखायला मिळणार असुन प्रत्येकाने या संधीचे सोने करण्यासाठी मूल येथील क्रिडा संकुलात उपस्थित राहण्यास विसरू नये. असे आवाहन नाट्य निर्माते, दिग्दर्शक आणि कलावंत प्राचार्य सदानंद बोरकर यांनी केले.
महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक विभागाच्या अंतर्गत सांस्कृतिक कार्य महासंचालनालय मुंबई व जिल्हा प्रशासन चंद्रपूर यांच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात १८ ते २० फेब्रुवारी या काळात मूल येथील क्रिडा संकुलात संपन्न होत असलेल्या झाडीपट्टी सांस्कृतिक महामहोत्सवाच्या पुर्वतयारीचा आढावा घेतल्यानंतर स्थानिक पञकारांशी बोलतांना केले.
दि. १८ ते २० फेब्रुवारी या काळात संपन्न होणाऱ्या झाडीपट्टी सांस्कृतिक महामहोत्सवाचे उदघाटन राज्याचे सांस्कृतिक कार्य, वने व मत्स्य व्यवसाय तथा जिल्ह्याचे पालकमंञी सुधीर मुनगंटीवार यांचे हस्ते १९ फेब्रुवारी रोजी दुपारी १२.३० वा. होणार आहे. पदमश्री डाँ. परशुराम खुणे यांचे अध्यक्षतेखाली होणाऱ्या महामहोत्सवाचे स्वागताध्यक्ष हरीश शर्मा राहणार असल्याचे प्राचार्य बोरकर यांनी सांगितले. उदघाटनापुर्वी सकाळी ११ वा. निघणाऱ्या लोक कलांच्या मिरवणुकीत प्रसिध्द अभिनेञी सोनाली कुलकर्णी यांचेसह पालकमंञी सूधीर मुनगंटीवार सहभागी होणार असुन प्रेक्षकांसाठी निघणारी मिरवणुक अविस्मरणीय राहणार असल्याने ही संधी न गमवण्याची विनंती त्यांनी केली. तीन दिवस चालणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या या मांदीयाळीत झाडीपट्टीतील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील झाडीपट्टी कलाकार सहभागी होणार असल्याचे सांगतांना प्राचार्य बोरकर यांनी झाडीपट्टी महामहोत्सवात नाटक, दंडार, खडीगंमत, रेला नृत्य,आदिवासी नृत्य, कीर्तन, भुलाबाईची गाणी, रोवण्याची गाणी, महादेवाची गाणी, डहाका, संबळ,सुमधुर सुगम संगीत आदी कार्यक्रम या महोत्सवात सादर केले जाणार असल्याचे सांगितले. यावेळी नाट्य कलावंत अरविंद झाडे, सुनिल कुकुडकर, किशोर उरकुंडवार यांचेसह झाडीपट्टी सांस्कृतिक महामहोत्सवाच्या स्थानिक संयोजन समितीचे सदस्य मोठ्या संख्येनी उपस्थित होते.