विकासाभिमूख पत्रकारिता समाजासाठी पथ
चंद्रपूर : मानवी जीवनातील पत्रकारितेचे स्थान अबाधित आहे. पत्रकारिता प्रशासन आणि समाज यातील दूवा म्हणून महत्त्वाची भूमिका बजावत आहे. पत्रकारिता आज काळानुरूप बदलली. हे बदल अपरिहार्यच आहे. मात्र समाजाला विकासात्मक दिशा देणारी पत्रकारिता नेहमीच पथदर्शी राहिल यात शंका नाही, असे प्रतिपादन जिल्हा पोलिस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांनी केले. व्हाईस ऑफ मीडिया चंद्रपूर जिल्हा व शहर कार्यकारिणीच्या वतीने हॉटेल सिद्धार्थ सभागृहात रविवारी पत्रकार दिन सोहळा आणि पत्रकारांना आरोग्य विमा वितरण कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.
अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार सुनील कुहिकर तर प्रमुख पाहुणे म्हणून व्हाईस ऑफ मीडियाचे विभागीय अध्यक्ष मंगेश खाटीक, ज्येष्ठ पत्रकार गोपालकृष्ण मांडवकर, चंद्रपूर प्रेस क्लबचे अध्यक्ष संजय तायडे, सत्कारमुर्ती वसंत खेडेकर, यशवंत डोहणे, व्हाईस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष संजय पडोळे, चंद्रपूर शहर अध्यक्ष सारंग पांडे उपस्थित होते. पोलिस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांनी भारतीय पोलीस प्रशासनात येण्यापूर्वी वर्तमानपत्र आयुष्याची जडणघडण करण्यात उपयुक्त ठरल्याची आठवण सांगून म्हणाले, विद्यार्थी जीवनात औरंगाबाद येथे असताना वर्तमानपत्रे मुद्रित होऊन लोकांपर्यंत कशी पोहोचतात, याचा जवळून अनुभव घेता आला. पत्रकारितेत प्रचंड ताकद असते. प्रशासन जिथे पोहोचू शकत नाही तिथे पत्रकारांची दृष्टी पोहोचते. त्यामुळे पत्रकारिता एका अर्थाने प्रशासनाचे डोळे आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. व्हाईस ऑफ मीडियाचे विभागीय अध्यक्ष मंगेश खाटिक यांनी पत्रकारांच्या कल्याणासाठी संघटनेने सुरू केलेले उपक्रम व ध्येय-धोरणांची माहिती दिली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते पत्रकारांना आरोग्य विमा प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. ज्येष्ठ पत्रकार वसंत खेडेकर यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा. डॉ. यशवंत घुमे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. जिल्हाध्यक्ष संजय पडोळे यांनी प्रास्ताविक तर संचालन विनायक रेकलवार यांनी केले. कार्यक्रमाला जिल्हाभरातील पत्रकार उपस्थित होते.
पत्रकारितेला हवे सत्याचे अधिष्ठान : कुहीकर
ज्येष्ठ पत्रकार सुनील कुहिकर यांनी जगभरातील मुद्रण व वृत्तसृष्टीच्या इतिहासावर अभ्यासपूर्ण प्रकाश टाकला. मराठी पत्रकारितेत यासंदर्भात स्थित्यंतरे कशी घडून आली, त्याचे स्वरूप व वैशिष्ट्ये कोणती याची साक्षेपी माहिती देऊन आजच्या पत्रकारितेची दिशा काय असावी यावर भाष्य करताना म्हणाले, पत्रकारिता ही जीवनाभीमूख असावी. चार ओळींची बातमी कुणाच्या आयुष्यात प्रकाश देऊ शकते तर तीच बातमी सत्याला धरून नसेल तर त्यांचे आयुष्यही उद्धवस्त करू शकते. त्यामुळे पत्रकारांनी आपल्या लेखणीला सत्याचे अधिष्ठान द्यावे. सत्यावर आपली जीवननिष्ठा असावी, याकडे लक्ष वेधून आपल्या करिअरमधील एक घटनाही सांगितली.
तंत्रज्ञान बदलले तरी पत्रकारितेची मूल्ये अबाधित
ज्येष्ठ पत्रकार गोपालकृष्ण मांडवकर यांनी पत्रकारितेच्या बदलत्या वर्तमानाचा वेध घेतला. आधुनिक तंत्रज्ञानामुळे पत्रकारितेत अनेक बदल झाले. पण पत्रकारितेची मूल्ये बदलणारी नाहीत. लोकहितासाठी लेखणी चालविताना पत्रकारांनी या मूल्यांची जाणीव ठेवावी. येणारा काळ आव्हानांचाच आहे. मात्र, काळानुरूप बदल स्वीकारून मूल्यांच्या बाजूने उभे राहावे. त्यासाठी अनुभव विश्व व्यापक करावे, असे आवाहनही केले. महानगर पत्रकारितेत अनेकांचा इंग्रजीकडे कल असल्याने वाड्.मय प्रचूर उत्तम मराठीत लेखन करणाऱ्या पत्रकारांची पिढी यापूढे तयार होणार की नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. संजय तायडे यांनी मराठी वृत्तपत्रसृष्टीच्या इतिहासावर प्रकाश टाकून माध्यमांच्या जगात वृत्तपत्रे आजही अधिक विश्वसनीय असल्याचे नमुद केले. मालकशाहीने निस्पृह पत्रकारितेवर मर्यादा आल्या. समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन विवेकी असेल तर पत्रकारिता अधिकाधिक प्रगल्भ होईल, अशी भूमिका मांडून नवीन पिढी वर्तमानपत्रांपासून दुरावत असल्याची खंत व्यक्त केली.