मूल : विद्यार्थ्यांनी सतत ज्ञानमार्गी असले पाहिजे. गुरूंचा प्रत्येक शब्द हा दिशादर्शक असतो. तो हृदयात साठवता आला पाहिजे. शिकवणे आणि शिकणे हा आपल्या जीवनातील एक अपूर्व सोहळा आहे. गुरू शिष्याचे नाते म्हणजे एक आत्मिक संवाद असतो. तो एकाग्रतेने अनुभवण्याचा प्रत्येकांनी प्रयत्न करावा. असे प्रतिपादन आनंद विद्यालय बेंबाळ च्या सेवानिवृत्त शिक्षिका इंदूताई वायडे यांनी केले.
शिक्षक दिनानिमित्त जि.प. प्राथमिक शाळा बोंडाळा बुज. येथे आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना त्या बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या, आई वडील आणि गुरूंचे विस्मरण कधी होऊ नये. हल्ली शिकण्याचे अनेक वैज्ञानिक मार्ग उपलब्ध आहेत. पण त्यांचा सदुपयोग करता आला पाहिजे. यावेळी शाळेतर्फे शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्धाटन अंगणवाडी शिक्षिका शकुंतला कटलावार यांच्या हस्ते झाले तर सभेच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप पाल हे होते. त्यांनी विद्यार्थ्यांना यथोचित मार्गदर्शन केले. यावेळी शिवराम भामदरे, ताराबाई गद्देकार, धनराज नागापूरे, भाग्यश्री पाल इ. मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन व्यवस्था शालीकराव गेडाम यांनी सांभाळली. प्रास्ताविक मुख्याध्यापक किशोर उरकुंडवार यांनी केले. संचालन चुन्नीलाल पर्वते यांनी तर आभार प्रदर्शन वैशाली महाकरकार यांनी केले. शिक्षक दिनानिमित्त घेतलेल्या वक्तृत्व व स्वयंशासन उपक्रमात गणेशा हजारे, शौर्य नागपुरे, साईसागर बोरकुटे, शगुण बोरकुटे,निखिल पाल, साची नागपुरे, स्पृहा बांगरे, योग पाल, प्रभात नागपुरे, आयुष पाल, श्रेया झाडे, कांचन पाल, कार्तिक पाल, रोहित बोरकुटे, नमन बोरकुटे, वेद पाल, स्वराली चुदरी, प्रगती पाल, हार्दिक पाल, समीक्षा पाल, लावण्या चुदरी, नव्या पाल या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.