मूल- कर्जाच्या ओझ्याखाली जीवन जगत असलेल्या शेतकऱ्यांचे नदीपात्रातील पाच कृषी विद्युत पंप चोरीला गेल्याने शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे ठाकले असुन परिसरात विद्युत मोटर पंप चोरणारी टोळी सक्रिय असावी. असा संशय व्यक्त केल्या जात आहे.
या आधीही अशा घटना घडल्या परंतु त्याचा शोध लागला नाही. यामूळे पुन्हा चोरट्याचे धाडस वाढल्याने दोन दिवसांपुर्वी रात्रीच्या वेळेस हळदी येथील नामदेव गावतुरे, महेश मुमडवार, रूपचंद चलाख, निलकंठ चलाख आणि बंडु कोतकोंडावार या पाच शेतकऱ्यांचे उमा नदी पाञामधील शेतीला पाणी पुरविण्यासाठी वापरल्या जाणारे पाच विद्युत पंप चोरीला गेल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सुमारे एक लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीचे साहित्य चोरट्यांनी लांबविले. नदीकाठावर मोटर पंप घेऊन अनेक शेतकऱ्यांनी पाइपलाइन करून शेतीला पाणी नेले. खरिपातील याच पाण्याद्वारे धानाचे उत्पन्नही घेतले. खरीप हंगाम संपला. रब्बी हंगामाचे नियोजन सुरू असताना चोरट्यांनी विद्युत पंप चोरण्याचा धडाकाच लावला आहे. मोटर पंप चोरून नेण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. यामुळे शेतीला पाणी कसे द्यायचे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. नवीन विद्युत पंप बसविण्याशिवाय पर्याय राहिला नाही तर, पुन्हा विद्युत पंप चोरला जाणार नाही याचीही खात्री राहिली नाही. विद्युत पंप चोरीच्या घटनेने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
पोलिस विभागाकडे तक्रार दाखल करण्यात येते मात्र पुढे कोणताही शोध लागत नसल्याने चोरट्यांचे फावत आहे. अशातच गुन्हेगाराला शिक्षा केव्हा ? असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. शेतातील विद्युत पंप बसविण्यासाठी ५० हजारांपेक्षा अधिक खर्च येतो. विद्युत पंप चोरीला गेल्यानंतर शेतकऱ्यांना मानसिक व आर्थिक असे दुहेरी नुकसान सहन करावे लागत असल्याने शेतकरी द्विधा मनस्थितीत आहे.
नैसर्गिक संकटाचा सामना करीत शेतकरी उत्पन्न वाढीचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळेच उन्हाळ्यातही हंगामी पिकांचे उत्पादन घेण्यावर भर देण्यात आला असताना मुल तालुक्यातील शेतकऱ्यांना वेगळ्याच संकटाला सामोरे जावे लागत आहे. खरीप हंगामानंतर रब्बी हंगामाचे नियोजन करीत असताना हळदी गावगन्ना, तुकूम गावातील तब्बल पाच कृषिपंप हे चोरीला गेल्याने शेतकरी चिंतेत आहेत. तसेच मुल गडचिरोली महामार्गावर चिमढा, टेकाडी, चांदली, खेडी या गावातील शेतकऱ्यांनी रानटी डुकराचा बंदोबस्त करण्यासाठी बँटरीवरील ताराचे कुंपण शेतीच्या सभोवताल लावले होते. त्यावरील बँटरीही चोरांनी लंपास केली. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. तीन दिवसांपूर्वी गडचिरोली महा मार्गावर चिमढा नदीच्या पुलावर पाच युवक रात्रीच्या वेळेला गप्पा करीत असताना पुलाला लागून असलेल्या शेतकऱ्यांनी त्या अज्ञात युवकांची विचारपुस केली असता शेती मध्ये चुरणा सुरू असल्याचे खोटे सांगुन वेळ मारून नेली त्यामुळे हीच मंडळी मोटार पंप चोरी करणारी असावी असा संशय व्यक्त केल्या जात आहे. एकाच रात्री पाच कृषिपंपाची चोरी झाल्याने गावातील इतर शेतकऱ्यांचाही झोप उडाली आहे. शिवाय चोरट्यांना जेरबंद करावे व भविष्यात अशा घटनांना आळा बसवण्य़ासाठी पोलीस प्रशासनाने यंत्रणा राबवण्याची मागणी नामदेव गावतूरे, नीलकंठ चलाख, सुनील कोतकोडावार, रूपचंद चलाख, महेश मुमडवार या अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी पोलिस विभागाकडे केली आहे. असून शेतातील मोटरपंप चोरी करणाऱ्या टोळीचा शोध घेणे पोलिसांसमोर आव्हान उभे आहे. अडचणीच्या प्रसंगी हजारो रुपयांचे मोटारपंप सध्याच्या प्रतिकूल परीस्थितीमध्ये विकत आणायचे तरी कसे असा सवाल शेतकरी बांधवांनी केला असून पोलिसांनी मोटार पंप चोरट्यांचा शोध लावावा अशी मागणी होत आहे.