वाघाच्या हल्ल्यात बैल आणि बिबटयाच्या हल्ल्यात रेडा जखमी

121
वाघाच्या हल्ल्यात बैल आणि बिबटयाच्या हल्ल्यात रेडा जखमी
चिचपल्ली वनपरिक्षेत्रातील घटना,शेतक-यांत भितीचे वातावरण
मूल 
:- वाघाच्या हल्ल्यात बैल आणि बिबटयाच्या हल्ल्यात म्हशीचा पिल्लू रेडा जखमी झाल्याच्या दोन्ही घटना चिचपल्ली वनपरिक्षेत्रातंर्गत ताडाळा आणि चिचाळा येथे शुक्रवारच्या रात्रौ घडली.दोन्ही घटनांमुळे शेतक-यामध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.धान कापणीच्या हंगामात वन्यप्राण्यांची दहशत वाढल्याने गावक-यांकडून वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
मूल ताडाळा मार्गावर महाबीज केंद्राच्या मागे रूषी सोनूले यांची धानाची शेती आहे.शेतात बैलाची जोडी बांधून होती.शुक्रवारी दुपारी चार वाजताच्या दरम्यान पटटेदार वाघाने बैलांवर हल्ला चढविला.त्यात एक बैल जखमी झाला.आरडाओरड झाल्याने वाघाने जंगलाकडे धुम ठोकली. सोनूले यांचे शेत मुख्य रस्त्यांपासून दोनशे मिटर अंतरावर आहे. तरीही झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने बैलाच्या जोडीवर हल्ला चढविला.दुसरी घटना तालुक्यातील चिचाळा येथे रात्रो दहा वाजताच्या दरम्यान घडली. शंकर मंकीवार यांचे चिचाळा येथे भर वस्तीत घर आहे.घराच्या शेजारी पाळीव जनावरांचा गोठा आहे.त्यात म्हशीचा पिल्लू रेडा दावणीला बांधून होता. बिबटयाने धानाच्या शेतीच्या मार्गाने गोठयात प्रवेश करून रेडयास जखमी केले. मानवी वस्तीत  बिबटयाने जनावरांवर हल्ला चढविल्याने गावक-यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने आणि गावक-यांनी फटाके फोडून बिबटयाला जंगलाचा रस्ता दाखविला. गावक-यांच्या सुरक्षेसाठी  वनविभागाच्या कर्मचा-यांनी चिचाळा येथे रात्रभर गस्त घातली. दोन्ही घटनांचा तपास चिचपल्ली वनपरिक्षेत्राधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मूल येथिल क्षेत्रसहायक मस्के आणि मरस्कोल्हे करीत आहे. तालुक्यातील दोन्ही घटनांमुळे शेतक-यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. शनिवारी सकाळी चिचाळा कवडपेठ मार्गावर अनेकांना वाघाचे दर्शन झाले. तालुक्यात वन्यप्राण्यांची दहशत पसरली आहे.याचा परिणाम धान कापणीवर होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here