अंधारलेल्या तालुका क्रीडा संकुलात पडला उजेड
बातमीचा परिणाम
प्रकाश झोतात केला खेळाडूंनी सराव
मूल :- अंधारात सापडलेले तालुका क्रीडा संकूल प्रकाशमय झाले आहे. पाच करोड रूपये खर्चून बांधलेल्या इनडोअर गेम हॉल मध्येही उजेड पडला आहे.परिसर प्रकाशमय झाल्याने खेळाडूंनी आनंद व्यक्त केला आहे. याबाबत ‘तालुका क्रीडा संकूल अंधारात’अशी बातमी प्रकाशित करण्यात आलेली होती.त्या बातमीचा परिणाम झालेला आहे. बातमी प्रकाशित होताच जिल्हा क्रीडा अधिकारी पुंड यांनी जातीने लक्ष घालून विदयुत मिटर आणि विदयुत सेवा जोडणीसाठी प्रयत्न केले. क्रीडा संकूलाच्या परिसरात विदयुत खांबांची उभारणी करण्यात आलेली होती.तसेच आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या निधीतून पाच करोड रूपये खर्चून इनडोअर गेम हॉल बांधण्यात आले होते.तिथेही विदयुत सेवेचा अभाव होता. येथील तालुका क्रीडा अधिकारी मुख्यालयी राहत नसल्याने तालुका क्रीडा संकूल समस्यांच्या गर्तेत सापडले होते. विदयुत सेवेसाठी मागील दोन वर्षांपासून दुर्लक्ष केल्या जात होते.तालुका क्रीडा संकूलाच्या समितीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. क्रीडा संकूलातील समस्यांचा आढावा प्रकाशित होताच तात्काळ संकूलामध्ये महाराष्ट राज्य वीज वितरण कंपनीकडून विदयुत मिटर बसविण्यात आले.तसेच संकूल परिसरातील उभारण्यात आलेल्या खांबामध्ये आणि इनडोअर गेम हॉल मध्ये विदयुत जोडणी करण्यात आली.चंद्रपूर येथील जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी जातीने स्वता उपस्थित राहून विविध समस्यांचा आढावा घेतला आणि ताटकळत असलेली कामे मार्गी लावली. त्यामुळे येथिल परिसर आणि इनडोअर हॉल प्रकाशमय झाले आहे. तालुका क्रीडा संकूलात उजेड पडल्याने सराव करणा-या खेळाडूंनी आनंद व्यक्त केला आहे.अंधारात सराव करणा-या खेळाडुंना सापांची भिती होती.उजेडामुळे खेळाडूंना निर्धास्त आता सराव करता येणार आहे.नोव्हेंबर महिण्यात तालुका क्रीडा संकूलात शालेय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे.