बडतर्फ कर्मचाऱ्याच्या आत्महत्या प्रकरणात बँकेचे संचालक आणि अधिका-यांना निष्कारण गोवण्याचा प्रयत्न, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत

42

मूल : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे काही संचालक, अधिकारी आदींच्या त्रासामुळे बडतर्फ कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप निराधार असल्याचे मत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी व्यक्त केले आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मूल शाखेतील संचालक कक्षात स्थानिक पत्रकारांशी बोलताना बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी बालाजी नकटू उरकुडे यांच्या प्राप्त तक्रारीनुसार बँकेच्या अधिकाऱ्यामार्फत बँकेच्या मेंडकी शाखेची सखोल चौकशी करण्यात आली. चौकशीत 17 लाख 67 हजार 315 रूपये 65 पैश्याची अपरातफर झाल्याचे निष्पन्न झाले, त्या अनुषंगाने बँकेची विनंती व विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था नागपूर यांचे आदेशानुसार जिल्हा विशेष लेखा परीक्षक साजन साखरे यांनी मेंडकी शाखेचे लेखा परीक्षण केल्यानंतर निदर्शनास आलेल्या अफरातफरी विषयी पोलीस स्टेशन ब्रह्मपुरी येथे तक्रार नोंदविली. प्राप्त तक्रारीवरून पोलीस स्टेशन ब्रह्मपुरी येथे कलम 420, 465, 466, 467 468, 471, 409, 34 भादविनुसार गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. तपासांती रवींद्र भोयर, अमित राऊत, कल्पना मसराम, ए.पी. नागपुरे व एस बी शेंडे या कर्मचाऱ्यांविरुद्ध पुरावे सापडल्याने २१ सप्टेंबर २०२० रोजी अटक केली. पोलिसांनी केलेल्या अटकेनंतर अमित राऊत यांनी पुढील कारवाई टाळण्यासाठी जमानती करिता न्यायालयाला विनंती केली, परंतु अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश चंद्रपूर यांनी विड्रॉल स्लिप व व्हाँवचर लिस्ट नुसार अमित राऊत यांनी 3 लाख 89 हजार 11 रुपयाची अफरातफर केल्याचे निष्पन्न होत असल्याचे कारण नमुद करून अमित राऊत यांची जमानतीची विनंती फेटाळून लावली. अमित राऊत यांना पोलिसांनी 21 सप्टेंबर 2020 रोजी अटक केल्यानंतर 12 नोव्हेंबर 2020 रोजी ब्रह्मपुरी न्यायालयाने जमानत दिली तोपर्यंत अमित राऊत पोलीस व न्यायालयीन कोठडीत होते. कोणताही शासकीय अथवा निमशासकीय कर्मचारी 48 तासाचे वर पोलीस किंवा न्यायालयीन कोठडीत असल्यास त्यांचेविरूध्द नियमानुसार निलंबनाची कार्यवाही करण्यात यावी असे निर्देश आहेत. अमीत राऊत यांच्या कोठडीतील कार्यकाळ दीड महिन्याच्या वर होत असल्याने बँक प्रशासनाने नियमानुसार त्यांचे विरुद्ध निलंबनाची कार्यवाही केली, सेवानिवृत्त सहकार अधिकारी शिरभय्ये यांचे मार्फतीने विभागीय चौकशी करण्यात आल्यानंतर अमित राऊत दोषी असल्याचा निवाडा दिला. विभागीय चौकशी अंती दोषी असलेल्या कर्मचाऱ्यांसंबंधी 30 जून 2021 रोजी पार पडलेल्या बँकेच्या संचालक मंडळाच्या सभेत ठराव क्रमांक 21 नुसार दोषी कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याची कार्यवाही करावी असे सर्वानुमाते ठरविण्यात आल्याने बँकेने दोषी कर्माचा-यांविरूध्द बडतर्फीची कारवाई केली. बडतर्फीच्या कारवाईनंतर अमित राऊत यांनी चंद्रपूर येथील कामगार न्यायालयात धाव घेतली, दरम्यान कामगार न्यायाधीश यांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी केल्यानंतर राऊत यांचे विरुद्ध झालेली चौकशी नैसर्गिक न्याय तत्त्वानुसार झाली असून चौकशी अधिकाऱ्याने दिलेला निवाडा कायदेशीर असल्याचा निर्णय 24 एप्रिल 2023 रोजी जाहीर केला. यामध्ये बँक प्रशासनाने कोणतीही गैरकृती केली नसून कोणत्याही कर्मचाऱ्यांविरुद्ध हेतू पुरस्सर कोणातीही कारवाई केली नाही. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शेतकरी व सर्वसामान्यांची बँक असल्याने त्यांच्या ठेवी आणि विश्वास जपण्यासाठी कारवाई केली आहे. असे असताना काही मंडळी अमित राऊत यांच्या आत्महत्येच्या प्रयत्नात बँकेच्या काही संचालक व अधिकाऱ्यांना गोवण्याच्या प्रयत्न करीत आहेत, ही बाब अयोग्य व निराधार असल्याचा दावा बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here